दीड हजार मतदान यंत्र उत्तर भारतातून दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:48 PM2019-08-22T12:48:34+5:302019-08-22T12:48:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासकीय स्तरावर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. प्रारूप मतदार याद्यांची तयारी पुर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रशासकीय स्तरावर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. प्रारूप मतदार याद्यांची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. आवश्यक कर्मचारी, वाहनांची यादी यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी लागणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन उत्तर भारतातून येथे दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात निवडणूक ऑक्टोबरच्या दुस:या व तिस:या आठवडय़ात होणार आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या तयारीसाठी आवश्यक त्या साधनांची जुळवाजुळव करण्याच्या सुचना यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.
यापूर्वीच मतदार यादी अद्ययावत करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नवमतदारांना सामावून घेता यावे यासाठी मोहिम राबविण्यात आली.
पुरेसे ईव्हीएम दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपासणीचे काम नंदुरबारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ परिसरात बुधवारपासून सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी येथे भेट देऊन प्रक्रीयेची पाहणी केली. उत्तर प्रदेशच्या सितापूर येथून 510 कंन्ट्रोल युनिट, 900 बॅलेट युनिट व 550 व्हीव्हीपॅट यंत्र आले आहेत. हरदोई येथून एक हजार कंन्ट्रोल युनिट आणि एक हजार 100 व्हीव्हीपॅट यंत्र प्राप्त झाले आहेत. तर लोकसभा निवडणुकीतील राखीव असलेले 346 कन्ट्रोल युनिट, एक हजार 679 बॅलेट युनिट आणि 359 व्हीव्हीपॅट प्रथमस्तरीय तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सर्व यंत्रांची तपासणी पुर्ण झाल्यानंतर सरमिसळ करून विधानसभा मतदारसंघात त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर परत एकदा सरमिसळ प्रक्रीय करून मतदान केंद्रांना यंत्र वितरीत करण्यात येतील. निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी प्रशासनाने आवश्यक प्रक्रीया सुरू केली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीदेखील प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रीया कामाची पाहणी करण्यासाठी कामाच्या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले आहे.
वाहने आणि कर्मचारी
चारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आवश्यकता असलेले कर्मचारी आणि वाहनाची व्यवस्था याची जुळवणी आधीच करण्यात आली आहे. तसा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. याशिवाय मतदान केंद्रांची व्यवस्था, त्यासाठीच्या इमारती, खोल्या यांचीही पहाणी यापूर्वीच झालेली आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर निवडणुकीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीयेत नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्याठिकाणी 1950 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला आहे. मतदार यादीतील शंकांचे निरसन, मतदार यादीतील नाव व तपशीलाची दुरुस्ती, निवडणुक प्रणालीची माहिती देणे, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे याबाबत संपर्क केंद्रावर माहिती घेता येईल. त्यासाठी या हेल्पलाईन क्रमांकासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत विधानसभा निवडणुक विषयक माहिती घेता येईल. लँडलाईन व मोबाईल अशा दोन्हीवरून ही सुविधा उपलब्ध असेल. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.