कोविड लसीसाठी एक कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:25 PM2021-01-14T12:25:29+5:302021-01-14T12:25:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील सदस्यांना कोविडची लस मोफत देण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील सदस्यांना कोविडची लस मोफत देण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, स्वत: नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी या सर्व शहरवासीयांनी लस टोचल्यानंतर त्या स्वत: लस टोचून घेणार आहेत.
कोविड लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यासाठी देशभर तयारी सुरू करण्यात आली आहे. लसीची किंमत किमान २२० रुपये इतकी आहे. दोन लस घ्यावयाच्या असल्यामुळे एका जणाला ४४० रुपये लागणार आहेत. सद्या तरी मोफत लस देण्यासंदर्भात काहीही सुतोवाच नाही. त्यामुळे गरीब जनता त्यापासून वंचीत राहू नये याकरीता नंदुरबार पालिकेेने आधीच तरतूद करून घेतली आहे. तब्बल एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या निधीची तरतूद करणारी नंदुरबार पालिका ही एकमेव ठरली आहे.
नंदुरबार शहरात साधारणत: चार हजार बीपीएल कुटूंब आहेत. एका कुटूंबात पाच सदस्य धरले तरी २० हजार बीपीएल नागरिकांना लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे या नागरिकांना किमान एक कोटी रुपयांची तरतूद पालिकेने केली आहे. शासनाकडून मोफत लस देणे किंवा निधीची तरतूद झाली तर ठिक अन्यथा पुन्हा पालिका निधीच्या तरतुदीसाठी पुढाकार घेणार आहे. स्थायी समितीची नुकतीच सभा झाली. या सभेत या निधीला मान्यता देण्यात आली असून लवकरच सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यामुळे गरीब नागरिकांना मोफत कोविड लस मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शहरातील सर्व नागरिकांना लस मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वत: लस टोचणार नाही असा संकल्पही नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केला आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पात आरोग्य विषयक इतरही विविध बाबींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात मोहल्ला क्लिनीक योजना, डायलेसीस सेंटर व पॅथोलॅाजी लॅब यासह इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकुण अंदाजपत्रक हे साधारणत: १४ लाख ८६ हजार ६८६ रुपये शिल्लक असणारे राहणार आहे.
नंदुरबार पालिकेने नेहमीच सर्वसामान्य नागरिकांचे हित पाहिले आहे. कोरोना काळातही सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न राहिला आहे. आता कोविडची लस बीपीएल कुटूंबांना मिळावी यासाठी एक कोटींची तरतूद केली आहे. स्वत: मी सर्वात शेवटी लस टोचून घेणार आहे. नागरिकांचे हित व त्यांचे आरोग्य याला प्रथम प्राधान्य देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,
नगराध्यक्षा, नंदुरबार.