नाचताना धक्का मारल्याच्या वादातून सुलवाडे येथे एकाचा खून
By मनोज शेलार | Published: March 28, 2024 04:55 PM2024-03-28T16:55:18+5:302024-03-28T16:55:28+5:30
सुलवाडे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ होळी उत्सवानिमित्त आयोजित गेर नृत्यांचा कार्यक्रम दुपारी १ वाजेच्या दरम्यान सुरू झाला.
नंदुरबार : शहादा तालुक्यातील सुलवाडे येथे होळी निमित्त आयोजित कार्यक्रमात गेर नृत्याच्या वादातून एका विवाहित तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना बुधवारी घडली. सुकलाल रघुनाथ पवार (वय २७) रा. सुलवाडे असे मृताचे नाव असून येथील पोलिसांत याप्रकरणी खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. सुलवाडे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ होळी उत्सवानिमित्त आयोजित गेर नृत्यांचा कार्यक्रम दुपारी १ वाजेच्या दरम्यान सुरू झाला.
त्यावेळी सोमनाथ गेंडल सोनवणे (वय २७) रा. बिलाडी-बामखेडा हा तरुण होळी उत्सवात परंपरागत गेर नर्तक बनून हातात चाकू घेऊन नृत्य करत होता. त्यावेळी त्याचा सुकलाल रघुनाथ पवार (वय २७) रा. सुलवाडे यास धक्का लागला. सुकलालने त्यास तू धक्का का मारला, विचारले. त्याचा राग येऊन सोमनाथ सोनवणे याने सुकलाल पवार याच्या छातीवर चाकूने चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यास तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र नंदुरबारला जात असतानाच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत योेगेश रघुनाथ पवार, रा. सुलवाडे यांनी फिर्याद दिल्याने सोमनाथ सोनवणे याच्याविरुद्ध म्हसावद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.