एक लाखाचा गांजा जप्त
By Admin | Published: January 21, 2017 12:13 AM2017-01-21T00:13:45+5:302017-01-21T00:13:45+5:30
मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर येथून गुरुवारी सायंकाळी गांजा भरून सेंधव्याकडे जाणारी जीप पकडली.
शिरपूर : तालुका पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर येथून गुरुवारी सायंकाळी गांजा भरून सेंधव्याकडे जाणारी जीप पकडली. चालकाला अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार फरार झाला़ 1 लाख 10 हजार रुपयांच्या साडेपाच किलो गांजासह गाडी जप्त करण्यात आली़
मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी 19 जानेवारी रोजी सायंकाळी पथकासह पळासनेर येथे नाकाबंदी करून गांजा भरून जाणारी बोलेरो जीप (क्ऱ एमपी 09-सीएल-4324) पकडली़ या वेळी चालक गोविंद आपसिंग पावरा (वय 22, रा़घेगाव, बलवाडी, ता़वरला, जि़बडवाणी) याला अटक करण्यात आली़, तर त्याचा साथीदार फरार झाला़ चालकाची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली़ गाडीची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिकच्या गोणीत गांजा मिळून आला़ पोलिसांनी 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा 5 किलो 400 ग्रॅम वजनाचा मादक पदार्थ असलेला गांजा व 3 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 4 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आह़े जीप लाकडय़ा हनुमान या गावातून गांजा घेऊन सेंधव्याकडे निघाली होती़
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या फिर्यादीवरून चालक गोविंद पावरा याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एऩडी़पी़सी़ अॅक्ट कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक जी़एस़ पाटील करीत आहेत़
पथकात पोलीस उपनिरीक्षक गोकूळ पाटील, वाय़ज़ेढिकले, संजय देवरे, संजीव जाधव, वाल्मीक आसापुरे, गोविंद माळी यांचा समावेश होता़