बारी येथे दहा लाखांचा लाकूडसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:01 PM2019-08-30T12:01:38+5:302019-08-30T12:01:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील बारी या गावातून महाराष्ट्र व गुजरात वनविभागाच्या संयुक्त कारवाईतून दहा लाखांपेक्षा जास्त किमतीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील बारी या गावातून महाराष्ट्र व गुजरात वनविभागाच्या संयुक्त कारवाईतून दहा लाखांपेक्षा जास्त किमतीचे अवैध लाकूड व इतर सामान जप्त करण्यात आले. अशा प्रकारची संयुक्त व मोठी कारवाई प्रथमच झाली असून शुक्रवारी दोन्ही राज्याच्या विभागात जप्त केलेल्या लाकडाची वाटणी करण्यात येणार आहे.
सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, गुजरातचे डांग व तापी डिव्हीजनचे उपवनसंरक्षक विवेक तोडकर, सहायक वनसंरक्षक जिगर अमीन, सहायक वनसंरक्षक गोविंद सुरया, उच्छलचे वनक्षेत्रपाल उपेंद्र राऊलजी, नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडा वनक्षेत्रपाल आर.बी. पवार, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल अनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे व कर्मचारी यांच्यासह नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा व गुजरात राज्य राखीव दल व वनविभागाचे सुमारे 500 कर्मचारी 30 ते 35 सरकारी वाहनातून नवापूर तालुक्यातील बारी गावात सकाळी 10 वाजता दाखल झाले. शहरातील काळंबा फाटय़ाजवळ दोन्ही राज्यातील कर्मचारी व अधिकारी एकत्रित आल्यानंतर जामतलावमार्गे बारी गावात गेल्यानंतर तेथील संशयित घरांची झडती घेण्यास सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी भल्या मोठय़ा फौजफाटय़ाला स्थानिकांनी विरोध केला. मात्र सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी त्यांची समजूत काढली व कारवाईचे चित्रीकरण केले जात असून कारवाईस विरोध केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला. त्यानंतर संयुक्त वनपथकातील कर्मचा:यांनी घराघरात झडती घेऊन ताज्या व अवैध तोडीचे खैर, शिसम व साग आदी प्रजातीचे साठवून ठेवलेले लाकूड काढण्यास सुरुवात केली. दोन ट्रक, एक टेम्पो, तीन जीप भरुन लाकूड काढण्यात आले.
या कारवाईत चार रंधा मशीनही जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या लाकडाची अंदाजित किंमत सुमारे 10 लाखांच्यावर असावी असा अंदाज आहे. चित्तथरारक पद्धतीने गावातील 200 ते 300 ग्रामस्थांच्या जमावातून वाहनांमध्ये मुद्देमाल भरुन नवापूर व उच्छल येथील काष्ठ आगारात जप्त करण्यात आलेला माल सकुशल आणण्यात आला.
बारी गावात प्रथमच अशी धाडसी कारवाई करण्यात आली असून आजर्पयतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. जप्त केलेल्या मालाची समसमान वाटणी करण्यात येणार असल्याने त्याची प्रत्यक्ष मोजदाद गुरुवारी होऊ शकली नाही.
उपवनसंरक्षक नंदुरबार व मुख्य वनसंरक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत वनपाल डी.के. जाधव, डी.जे. वळवी, वनरक्षक अरविंद निकम, भूपेश तांबोळी, कल्पेश अहिरे, एस.डी. बडगुजर, भानुदास वाघ, एन.आर. पाटील, अशोक पावरा, कमलेश वसावे, आरती नगराळे, दिपाली पाटील, वाहन चालक एस.एस. तुंगार, माजी सैनिक विशाल शिरसाठ, एस.आर. कासे, सर्व वनमजूर व कर्मचा:यांनी परिश्रम घेतले. या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
नवापूर तालुक्यातील बारी येथे घरांमध्ये साठवून ठेवलेल्या अवैध लाकूड जप्तीच्या कारवाईसाठी गुजरात राज्य राखीव दल व वनविभागाच्या सुमारे 500 कर्मचा:यांचा फौजफाटा नेण्यात आला होता. बारी गावात हे अधिकारी व कर्मचारी पोहोचल्यानंतर सुरुवातीला ग्रामस्थांनी विरोध केला. मात्र कारवाईचे चित्रीकरण होत असल्याचे सांगितल्यानंतर ग्रामस्थ नरमले. बारी गावातील घराघरात झडती घेऊन अवैध लाकूड साठा जप्त करण्यात आला. हा लाकूडसाठा नवापूर व उच्छल येथील काष्ठ आगारात जमा करण्यात आला आहे.