एका संशयिताचा गुजरातमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:22 PM2020-07-19T12:22:53+5:302020-07-19T12:23:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील भिमनगरमधील ७५ वर्षीय वृद्धेला कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर सुरत येथे उपचार सुरु ...

One suspect dies in Gujarat | एका संशयिताचा गुजरातमध्ये मृत्यू

एका संशयिताचा गुजरातमध्ये मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील भिमनगरमधील ७५ वर्षीय वृद्धेला कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर सुरत येथे उपचार सुरु आहेत तर अहमदाबाद येथे कामावर असलेला पिंप्रीपाडा येथील ४५ वर्षीय पुरुष कोरोनासदृश्य लक्षणांमुळे उपचारादरम्यान मृत झाल्याने शुक्रवारी मध्यरात्री अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दफनविधी पार पडला. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आठ झाली आहे. दरम्यान, शहरातील एका कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील भिमनगरमधील वृद्धेला १० जुलै रोजी ताप आल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीअंती मलेरियाचे निदान झाले. तेथे व शहरातील खाजगी दवाखान्यात तीन दिवस त्यांनी औषधोपचार घेतले. १४ जुलै रोजी पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. गुजरातमधील सुरत येथे त्यांना दोन दिवसापूर्वी नेण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तेथील प्रशासनाने ही बाब जिल्हा प्रशासनास कळविल्याने स्थानिक प्रशासनाकडून भिमनगरचा परिसर सील करुन कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आला. वृद्धेच्या परिवारातील एकास विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले तर पाच जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. शहरातील तिघांवर आधीच सुरत येथे तर २८ वर्षीय महिलेवर व्यारा येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, महादेव गल्लीतील तिघांपैकी दोघांचा स्वॅब अहवाल निगेटीव्ह आल्याने शहरास दिलासा मिळाला आहे.
गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्रीपाडा ता.नवापूर येथील ४५ वर्षीय पुरुष अहमदाबाद येथे खाजगी कंपनीत कामाला होता. जवळच असलेल्या बंधारे गावातील सहा जणही त्याच्यासोबत कामावर होते. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यास एक आठवड्यापूर्वी सेंट्रल हॉस्पिटल पालनपूर, जि.बनसकांठा येथे दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्वॅबचा चाचणी अहवाल प्रलंबित असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तेथून पिंप्रीपाडा येथे पाठवण्यात आले. त्याच्यासोबत काम करणारे बंधारे येथील सहा जणांनी त्याचा मृतदेह आणला. शुक्रवारी रात्री नऊ वाजता मृतदेह पिंप्रीपाडा येथे पोहचल्यावर मयताच्या शेतात रात्री ११ वाजेपर्यंत शासकीय नियमानुसार गावकऱ्यांच्या अनुपस्थितीत मृतदेह दफन करण्यात आला. त्या सहा जणांनीच हा दफनविधी पूर्ण केला. त्या सहाही जणांना नवापूरच्या विलगीकरण कक्षात मध्यरात्री १२ वाजता दाखल करण्यात आले. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक पोलीस निरीक्षक धीरज महाजन, निवासी नायब तहसीलदार कोकणी, विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
दरम्यान, नवापूर शहरातील राजीवनगरमधील रहिवासी असलेल्या ७२ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णावर सुरत येथे सुरु असलेल्या उपचारादरम्यान कोरोना अहवाल शनिवारी निगेटीव्ह आला. ते संसर्गमुक्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: One suspect dies in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.