देवमोगरा ग्रामपंचायतीसाठी एक हजार ९०० मतदार करणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:27 AM2021-01-15T04:27:00+5:302021-01-15T04:27:00+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील एकमेव देवमोगरा (पुनर्वसन) ग्रामपंचायतसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतीत प्रभाग एकमध्ये २७५ पुरुष व २६९ महिला, ...
अक्कलकुवा तालुक्यातील एकमेव देवमोगरा (पुनर्वसन) ग्रामपंचायतसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतीत प्रभाग एकमध्ये २७५ पुरुष व २६९ महिला, प्रभाग क्रमांक दोनमध्ये ३०३ पुरुष व ३०५ महिला, तर प्रभाग क्रमांक ३ मधून ३७८ पुरुष व ३८३ महिला असे एकूण एक हजार ९१३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी मतदान अधिकारी तसेच कर्मचारी रवाना झाले असून, सोमवारी मतदानाला सुरुवात होणार आहे. देवमोगरा सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या सुमारे १२ गावांतील नागरिकांचे पुनर्वसन या वसाहतीत झाले असून, या ग्रामपंचायतीवर एकाच राजकीय पक्षाचे अधिकाधिक वर्चस्व राहिले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गावातून यापूर्वीच रूट मार्च केला असून, निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार सचिन मस्के, निवडणूक नायब तहसीलदार राजेश अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी बी.डी. मोहिते व सहाय्यक पंकज पाटोळे निवडणुकीचे काम पाहत आहेत.
मतदानासाठी तीन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रावर सहा असे एकूण तीन मतदान केंद्रांवर १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी गुरुवारी देवमोगरा येथे रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.डी. मोहिते यांनी दिली आहे.