नोकरीच्या आमिषाने एकाची २२ लाख ५१ हजारात फसवणूक
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: June 26, 2023 02:37 PM2023-06-26T14:37:07+5:302023-06-26T14:37:50+5:30
नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज शेलार, नंदुरबार : नोकरीच्या आमिषाने एकाची २२ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर, ता. नंदुरबार येथील एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, निजामपूर, ता. साक्री येथील अजय जगन्नाथ बहिरम (३४) यांना गंगापूर, ता. नंदुरबार येथील पंडित छगन पवार (४५) यांनी नोकरीचे आमिष दाखविले होते. त्यासाठी नंदुरबारातील नवापूर चौफुलीवरील एका हॉटेलमध्ये बसून २३ लाख रुपये पवार यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये घेतले होते. परंतु अनेक दिवस होऊनही नोकरीबाबत कुठलीही हालचाल झाली नसल्याने बहिरम यांना आपण फसविले गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून पैसे परत मागितले असता त्यांनी ४९ हजार रुपये परत दिले. उर्वरित रक्कम दिलीच नाही. त्यामुळे अजय बहिरम यांनी नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिल्याने पंडित पवार यांच्याविरुद्ध २२ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.