तळोद्यात विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार
By भूषण.विजय.रामराजे | Published: September 6, 2022 06:35 PM2022-09-06T18:35:39+5:302022-09-06T18:37:45+5:30
२० जणांवर दंगलीचा गुन्हे दाखल झाला आहे.
नंदुरबार : जिल्ह्यातील तळोदा शहरात पाचव्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून झालेल्या हाणामारीत ३ जण जखमी झाले. यातील एकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी २० जणांवर दंगलीचा गुन्हे दाखल झाला आहे.
सोमवारी तळोदा शहरातील दुसऱ्या टप्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूका निघाल्या होत्या. दरम्यान शहरातील सोनार गल्लीतील रात्री ११ वाजेच्या सुमारास मिरवणूकीत युवक नाचत असताना त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाली. यात प्रतीक मोहन मगरे, निलेश चव्हाण व एक महिलेस किरकोळ दुखापत झाली आहे. तर योगेश उधन पाटील याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजय कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय दिपक माळी, लंकेश मोहन माळी, नितीन वाघ, भैय्या संजय माळी, प्रतीक मोहन मगरे, निलेश चव्हाण, आशितोष पटेल, गोलू दातिर, चंद्रकांत गुरव, योगेश गुरव, योगेश पाटील, यांच्यासह अन्य ५ ते ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल हे करत आहेत.