एकेरी मार्गामुळे वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 04:59 PM2020-01-08T16:59:46+5:302020-01-08T17:01:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा गावानजीक रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा गावानजीक रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांची वर्दळ पाहता एकेरी वाहतुकीमुळे येथे दिवसभरात अनेकवेळा वाहतूक ठप्प होत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी व ठेकेदाराने खाजगी माणसे नेमून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते शहादा मार्गावर प्रकाशा गावानजीक अवघ्या एक किलोमीटर अंतरावर रस्त्याचे काम सुरू आहे. चार ठिकाणी हे काम सुरू असून रस्त्याच्या एका बाजूचे काँंक्रिटीकरण झालेले आहे तर दुसऱ्या बाजूला काम अजून अपूर्ण आहे. वाहतुकीसाठी फक्त पाच मीटरचा रस्ता आहे. येथून एकाचवेळी दोन वाहने पास होऊ शकत नाही. या पाच मीटरच्या रस्त्यादरम्यान दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर लगेच वाहतूक ठप्प होते. याठिकाणी दिवसभर वाहतुकीचा खोळंबा होतो. या खोळंब्यामुळे प्रवासी व वाहनधारक अक्षरश: कंटाळले आहेत. नियमित ये-जा करणारे कर्मचारी व विद्यार्थ्यांना या समस्येमुळे वेळेवर कार्यालयात व शाळेत पोहोचता येत नाही. या समस्येवर उपाययोजना म्हणून ज्या ज्या ठिकाणी एकेरी वाहतूक आहे अशा ठिकाणी रस्त्याच्या एका टोकाला वाहने थांबवून दुसºया टोकाकडील वाहने काढावी लागतात. ती वाहने गेल्यानंतर पहिल्या टोकाकडील वाहने काढावीत. जोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होत नाही तोपर्यंत याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी व त्यांच्या मदतीसाठी संबंधित ठेकेदाराने खाजगी माणसे नेमण्याची आवश्यकता आहे. एवढीही उपाययोजना केली तरी याठिकाणी वाहतुकीचा होणारा खोळंबा थांबणार आहे. प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी याठिकाणी थांबतात. मात्र चार ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने कर्मचारी संख्या पुरेशी नाही. शिवाय वाहन चालकांमध्ये वाद झाल्यास ते वाद सोडविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मध्यस्थी करावी लागते. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पोलिसांची संख्या वाढवून खाजगी ठेकेदारानेही माणसे नेमण्याची मागणी होत आहे.