कोरोना काळातील तीन मेळाव्यातून केवळ ६०० युवकांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:12 AM2020-12-20T11:12:51+5:302020-12-20T11:13:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील युवकांना रोजगार देण्याची हमी देणा-या काैशल्य विकास विभागाकडून कोरोना काळात केवळ ६०० उमेदवारांना ...

Only 600 youths got employment from the three fairs of Corona period | कोरोना काळातील तीन मेळाव्यातून केवळ ६०० युवकांना मिळाला रोजगार

कोरोना काळातील तीन मेळाव्यातून केवळ ६०० युवकांना मिळाला रोजगार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील युवकांना रोजगार देण्याची हमी देणा-या काैशल्य विकास विभागाकडून कोरोना काळात केवळ ६०० उमेदवारांना रोजगार देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षात हे मेळावे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करुन घेत युवकांना रोजगार दिला गेला आहे. 
             नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात राहणा-या युवकांसाठी काैशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडून  मेळावे आयोजित करुन रोजगार देण्याची प्रक्रिया करण्यात येते. बाहेरील कंपन्या तसेच सरकारी कार्यालयांमध्ये रिक्त पदांवर कुशल कामगार म्हणून नियुक्ती देण्यात येते. गेल्या काही वर्षात या विभागाचे स्वरुप बदलून ऑनलाईन नोंदण्या करुन मेळाव्यांना पाचारण करण्यात येत होते. परंतू कोरोनामुळे हे कामकाज थांबले होते. दरम्यान शासनाकडून १२ व १३ डिसेंबर रोजी महारोजगार मेळावा घेण्यात आला आहे. परंतू यात नंदुरबार जिल्ह्यातील नेमक्या किती युवकांना नोकरी देण्यात आली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांना प्रतिसाद मिळत असल्याने ते ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याची अपेक्षा युवावर्गाकडून करण्यात आली आहे. 

अधिकारीच मिळेना 
काैशल्य विकास विभागाचे नंदुरबार येथे रोजगार व उद्योजकात कार्यालय आहे. याठिकाणी सहायक आयुक्त पदावर अधिकारी नियुक्त करण्यात येतात. परंतू गेल्या दोन वर्षात येथे पूर्णवेळ अधिकारीच नसल्याचे चित्र आहे. गेल्या एक महिन्यापासून येथील अधिकारी जळगाव येथे बदलून गेले आहेत. त्यांच्याजागी नाशिक येथून सहायक संचालक दर्जाच्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतू त्यांनी अद्याप चार्ज घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. 

रोजगार मेळाव्यांना जेमतेम प्रतिसाद
एप्रिल ते सप्टेंबर २०२० या काळात नंदुरबार जिल्ह्यात तीन मेळावे झाले आहेत. या मेळाव्यातून एकूण ७३२ युवकांनी हजेरी दिली हाेती. यातील ५७२ युवकांना रोजगार मिळाला होता. यानंतर मात्र मेळावे झालेले नाहीत. १२ डिसेंबर रोजी शासनाचा महारोजगार मेळावा घेण्यात आल्याची माहिती आहे. परंतू त्यात युवकांना रोजगार दिला किंवा कसे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. या मेळाव्यांनाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. या विभागाचे कार्यालय नेमके कुठे, ऑनलाईन नोंदणी कशी करावी यासह इतर अनेक बाबींची माहितीच नसल्याने युवकांकडून सांगण्यात आले. 

शिक्षण पूर्ण झाले आहे. नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहे. रोजगार कार्यालयात नोंदणीही केली होती. परंतू बोलावणे आलेले नाही. रोजगार कार्यालयाने नोंदणीनंतर युवकांना बोलावून नाेकरीसंदर्भात माहिती दिली पाहिजे. किमान मेळावे होतात. त्याततरी इच्छुकांना बोलावले पाहिजे.  
- जितेंद्र भगवान पाटील, शनिमांडळ ता. नंदुरबार. 

नाव नोंदणी करुन नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. शिक्षणानंतर रोजगाराची समस्या सुटेल अशी अपेक्षा होती. परंतू मेळाव्यांसाठी आजवर बोलावणे आले नाही. मेळावे होतात याचीही माहिती मिळत नाही. प्रशासनाने माहिती देण्याची सोय करावी.  
- महेश नवल कुवर, रा. नंदुरबार 

रोजगार नसल्याने शेतीत कामाला जात आहे. ब-याचवेळा नोकरीसाठी चाैकशा करुनही उत्तर मिळत नाही. प्रशासनाने याेग्य ती माहिती देत कामकाज केले पाहिजे. नाव नोंदणी केली, रिन्यूअल केले परंतू बोलवणेच आले नाही.   
- रोहित रुपचंद गारोळे, रनाळे ता. नंदुरबार. 

Web Title: Only 600 youths got employment from the three fairs of Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.