सोयाबीन उगवण क्षमतेबाबत दोनच तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:45 AM2020-07-16T11:45:57+5:302020-07-16T11:46:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस बियाण्याचा प्रश्न समोर आला आहे़ परंतु नंदुरबार जिल्ह्यात याउलट स्थिती असून केवळ दोन शेतकऱ्यांनी बियाणे उगवणीबाबत तालुकास्तरावर तक्रार दिली होती़ या तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे़
शहादा तालुक्यातील एक आणि अक्कलकुवा तालुक्याच्या एका शेतकºयाने सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर रोपच उगवले नसल्याची तक्रार तालुका कृषी विभागस्तरावर केली होती़ या तक्रारीनुसार बियाणे कंपन्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी त्या परस्पर बदलून देत शेतकºयांचे समाधान करुन दिले आहे़ सोयाबीन बियाण्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागाला सक्तीचे आदेश देत बियाणे तपासणी करुन घेण्याचे सूचित केले आहे़ त्यानुसार गुणनियंत्रण अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय पथके बियाणे तपासणी करत आहेत़ दोन तक्रारी वगळता जिल्ह्यात एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे़ दरम्यान सोयाबीन बियाण्याची योग्य प्रकारे वाहतूक न करणे, साठा करुन ठेवताना अयोग्य जागा तसेच शेतकºयांकडून ओल नसलेल्या जमिनीत पेरणी यामुळे अडचणी येत असाव्यात असा अंदाज कृषी तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे़ जिल्ह्यात महाबीजसह पाच खाजगी कंपन्या सोयाबीन बियाण्याचा दरवर्षी पुरवठा करतात़
जिल्ह्यात यंदा २७ हजार २४१ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे़ यातून आजअखेरीस १७ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़ जिल्ह्यात प्रतीहेक्टर ७५ किलो सोयाबीन बियाणे लागते़ यामुळे कृषी विभागाने १५ हजार ७५० क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवक करुन घेतली आहे़