मुंबई भरारी पथकाच्या कारवाईत नवापुरात दोन कोटीची अवैध दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:23 PM2018-06-27T17:23:29+5:302018-06-27T17:23:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने सुकवेल, ता.नवापूर येथील शेतात केलेल्या कारवाईत तब्बल दोन कोटी रुपयांचे हरियाणा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथील राज्य भरारी पथकाला सुकवेल, ता.नवापूर शिवारातील शेतात अवैध मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथक मंगळवारी रात्री नवापूरात दाखल झाले. सोबत नाशिक विभागाचे भरारी पथक आणि नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांना सोबत घेवून कारवाई केली. सुकवेल येथील शेतातील घरात हरियाणा बनावाटीचा मोठा अवैध दारूचा साठा आढळून आला. त्यात रॉक अॅण्ड स्ट्रॉम व्हिस्कीच्या 12 हजार 576 बाटल्या, गोवा प्रिमियम व्हिस्कीच्या 26 हजार 116 बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या 61 हजार 200 बाटल्या, ऑल सिझन व्हिस्कीच्या तीन हजार 624 बाटल्या, एपिसोड व्हिस्कीच्या 768 बाटल्या, रॉयल ग्रीन व्हिस्कीच्या 288 बाटल्या, रॉयल ग्रीन व्हिस्कीच्या 192 बाटल्या आदी वेगवेगळ्या विदेशी दारूचे 2,475 बॉक्स जप्त करण्यात आले. त्यांची किंमत दोन कोटी दोन लाख 50 हजार 720 रुपये इतकी आहे. हा सर्व साठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत संशयीत एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, दक्षता व अंमलबजावणी पथकाचे संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रसाद सुव्रे, निरिक्षक प्रसाद सास्तूरकर, दिपक परब, दिलीप काळेल, प्रमोद कांबळे नंदुरबार अधीक्षक मोहन वर्दे व पथकाने केली. त्यांना नाशिक विभाग, पुणे विभाग भरारी पथक व नंदुरबारच्या पथकाने मदत केली. नवापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचा:यांनी बंदोबस्त ठेवला.