नंदुरबार जिल्हा परिषदेत महाआघाडीला संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 04:18 AM2020-01-09T04:18:54+5:302020-01-09T04:19:51+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही.
नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. भाजप २३, काँग्रेस २३, शिवसेना ७ तर राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला आहे. मात्र, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची संधी आहे.
सहापैकी तीन पंचायत समितींवर भाजप, दोन पंचायत समितींवर काँग्रेस तर एका पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी चारही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. त्यामुळे तिरंगी व चौरंगी लढती रंगल्या होत्या. निकालाचा कौल पहाता कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. भाजप व काँग्रेसने सारख्याच अर्थात प्रत्येकी २३ जागा जिंकल्या. बहुमतासाठी किमान २९ सदस्य लागणार असल्याने सात जागांवर विजयी झालेल्या शिवसेनेला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्टÑवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. भाजपने नंदुरबार व शहादा तालुक्यात वर्चस्व राखले. काँग्रेसने नवापूर धडगाव व शहादा तालुक्यात वर्चस्व राखले. शिवसेनेने धडगाव व नंदुरबार तालुक्यात जागा मिळविल्या. राष्टÑवादीला केवळ नवापूर तालुक्यातच जागा मिळू शकल्या.
>पाडवी यांची पत्नी पराभूत
निवडणुकीत माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे दोन्ही पूत्र, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र व सून, माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी, माजी आमदार शरद गावीत यांच्या दोन्ही कन्या, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी यांची कन्या व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र आदी निवडून आले तर आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना मात्र, पराभव पत्करावा लागला.