तीन पोलिसांवर गुन्हा दाखलचे आदेश
By admin | Published: February 23, 2017 12:37 AM2017-02-23T00:37:28+5:302017-02-23T00:37:28+5:30
कोठडीतील संशयिताला जबर मारहाणीचे प्रकरण
नंदुरबार : पोलीस कोठडीतील संशयितास मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने तीन पोलीस कर्मचाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय आठ दिवसाच्या आत प्राथमिक तपासाचा अहवाल कोर्टात सादर करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.
राकेश मोरे, योगेश लोंढे, रवींद्र कुंवर अशी या तीन पोलीस कर्मचाºयांची नावे आहेत. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात १७ रोजी दाखल मारहाणीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रवीण महेश मराठे रा.नंदुरबार व इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना पोलीस कोठडीदेखील सुनावण्यात आली होती. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या दालनात प्रवीण मराठे यास जबर मारहाण करण्यात आल्याचे त्याने न्यायालयात दिलेल्या जबाबात सांगितले. प्रभारी न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी संशयिताचे सर्व म्हणणे ऐकून या तीन कर्मचाºयांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात २४ तासांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. शिवाय आठ दिवसांच्या आत प्राथमिक तपासाचा अहवाल सादर करावा. तसे न केल्यास संबंधित अधिकाºयांविरुद्ध कारवाईचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी मारहाण व शिवीगाळ करण्याची कृती ही पोलिसांच्या कार्यालयीन कामाच्या सज्ञेत येत नसल्याने या गुन्हेगारी कृत्याविरुद्ध दखल घेण्याचे अधिकार न्यायाधिशांना असल्याचे आरोपींचे वकील अॅड.मोसम चौधरी यांनी सांगितले.