गोशाळेला उदरनिर्वाह भत्ता देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:42 PM2020-09-28T12:42:05+5:302020-09-28T12:42:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : अवैधरित्या प्राण्यांची वाहतूक करून छळ केल्याप्रकरणी शहादा न्यायालयाने दोन गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ९६ हजार व ...

Order to pay subsistence allowance to Goshala | गोशाळेला उदरनिर्वाह भत्ता देण्याचे आदेश

गोशाळेला उदरनिर्वाह भत्ता देण्याचे आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : अवैधरित्या प्राण्यांची वाहतूक करून छळ केल्याप्रकरणी शहादा न्यायालयाने दोन गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ९६ हजार व दोन लाख ४१ हजार दोनशे रुपये असा सुमारे तीन लाख ३७ हजार दोनशे रुपये उदर निर्वाह भत्ता गोशाळेस द्यावा असे आदेश शहादा न्यायालयाने दिले आहेत. तशा आशयाचे प्रतिज्ञापत्र संशयीताने येत्या तीन दिवसात न्यायालयात करून घ्यावे तसे न केल्यास संबंधित गोवंश कायमस्वरूपी गोशाळेकडे जप्त होतील असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या खटल्याची हकिकत अशी, २० जुलै रोजी शहादा पोलिसांनी भिमसिंग सन्या पटेल रा. मांडवी, दिनेश मंगल्या पाडवी रा. खामला ता. धडगाव या दोघांना महिंद्रा पिकप वाहनातून आठ बैलांची वाहतूक करताना पकडले होते. या दोघांच्या विरोधात शहादा पोलीस स्टेशनला मोटार वाहन अधिनियम व प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात येऊन पोलिसांनी आठ बैलांसह महिंद्रा पिकप वाहन जप्त केली होती.
शहादा पोलिसांनी जप्त केलेले गोवंश श्री अरिहंत गोसेवा सेवाभावी संस्था चौपाळे तालुका नंदुरबार येथे ठेवण्यात आलेले होते. सदर गोशाळेच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या गोवंशाचा ताबा संबंधितांना न देता तो गोशाळेकडे ठेवण्यात यावा त्याचप्रमाणे या प्रकरणाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत गोवंशाच्या उदरनिवार्हासाठी शासन निर्णयानुसार उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. सदर खटल्याचे कामकाज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. काल्हापुरे यांच्या न्यायालयात चालले. आम्ही केवळ गुरांची वाहतूक करीत होतो यामुळे आम्ही मालक नाही असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला. तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये वाहतूकदारही मालक आहे असे तक्रारदाराच्या वतीने मांडण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती काल्हापुरे यांनी याप्रकरणी संशयीत आरोपी हे प्राण्यांची वाहतूक करीत असले तरी त्यांच्या ताब्यात गोवंश आढळून आले असल्याने ते सुद्धा मालक असल्याचे सिद्ध होते. परिणामी त्यांनी ९६ हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता गोशाळेला द्यावा त्याचप्रमाणे जप्त केलेल्या गोवंशाच्या ओळखीसाठी गोशाळेने व पोलिस तपासी अंमलदार यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यास टँग करून घ्यावे असे आदेश दिले आहेत.
दुसरा गुन्हा सारंगखेडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. यात युनूस खान उर्फ बबलू मजीद कुरेशी व सत्तार इब्राहीम कुरेशी दोन्ही रा. सारंगखेडा, रज्जाक शेख मुनाफ रा. धुळे यांच्या ताब्यातून १६ गायी व दोन बैल असे एकूण १८ गोवंश जप्त करण्यात आले होते. यातही गो शाळेचा अर्ज वैध ठरवीत न्यायमूर्ती काल्हापुरे यांनी संबंधित आरोपींनी दोन लाख ४१ हजार २०० रुपये उदरनिर्वाह भत्ता गो शाळेला देण्याचे आदेश दिले आहे.
याप्रकरणी गो शाळेच्या वतीने अ‍ॅड.प्रितेश जैन यांनी कामकाज पाहिले. त्यांना मुंबई येथील अ‍ॅड. राजेश गुप्ता व अनिकेत टंडन तसेच नंदुरबार येथील गौरक्षक विशाल जायस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.

गेल्या काही दिवसात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक केल्याप्रकरणी शहादा म्हसावद व सारंखेडा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांचा निकाल लागला असून उर्वरित तीन गुन्ह्यांचे कामकाज प्रगतिपथावर आहे. न्यायमूर्ती काल्हापुरे यांनी निकाल देताना म्हटले आहे की, दोन्ही गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे केवळ वाहतूक करीत असले तरी कायद्यान्वये तेसुद्धा या गोवंशाचे मालक आहेत. यामुळे आरोपींनी जप्त केलेल्या गोवंशाच्या उदरनिवार्हासाठी गो शाळेला न्यायालयाने ठरवलेली रक्कम देणे गरजेचे आहे. गोवंश वाहतूक प्रकरणी न्यायालयाने दिलेला हा निकाल अशा प्रकारचा पहिलाच निकाल ठरलेला आहे. न्यायालयाच्या निकालाचे विविध स्वयंसेवी संस्थासह राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे.

Web Title: Order to pay subsistence allowance to Goshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.