रावला पाणी येथील स्मारकाचे काम मकरसंक्रांतीला सुरू करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:57 PM2021-01-07T12:57:37+5:302021-01-07T12:57:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील रावला पाणी येथील स्वातंत्र्य स्मारकासाठी शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून निधी उपलब्ध झालेला असताना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील रावला पाणी येथील स्वातंत्र्य स्मारकासाठी शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून निधी उपलब्ध झालेला असताना अद्यापपर्यंत कुठलेच काम सबंधित बांधकाम विभागाने सुरू केलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकऱ्यांनी याबाबत यंत्रणेला जाब विचारणा करून मकर संक्रांतीला कामाचा शुभारंभ करून मे महिन्या अखेर काम पूर्ण करण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान गवाकऱ्यांनीदेखील सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तळोदा तालुक्यातील रावला पाणी येथे आदिवासींनी १९४२ साली ब्रिटीश सरकार विरोधात स्वातंत्र्य संग्राम पुकारला होता. त्यामुळे आदिवासींवर ब्रिटिशांनी अमानूष पणे गोळीबार केला होता. त्यात आदिवासी स्वातंत्र्य वीर शहीद झाले होते. साहजिकच रावला पाणी येथील आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामाची युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी तेथे स्वातंत्र्य स्मारक निर्माण करावे, अशी या परिसरातील आदिवासी जनतेची गेल्या अनेक वर्षंपासूनची मागणी होती. त्यामूळेच शासनाने दोन वर्षांपूर्वी येथील विकासासाठी दोन कोटी साठ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु सबंधित बांधकाम विभागाने काही किरकोळ कामा व्यतिरीक्त ठोस काम केले नाही. साहजिकच कामास गती देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारुड, सहायक जिल्हाधिकारी आविशंत पांडा, उपवनसंरक्षक पी.के. बागुल, तहसीलदार गिरीष वाखारे यांनी बुधवारी दुपारी रावलापणी येथे भेट देवून गोळीबार झाला होता त्याठिकाणी भेट दिली. या वेळी कामची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतली.
याठिकाणी जमीन सपाटीकरण कामा व्यतिरीक्त ठोस काम झाले नसल्यामुळे बांधकामा विभागाच्या कार्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या मकर संक्रांतीला कामाचा शुभारंभ करून येत्या मे महिन्या अखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याची तंबी बांधकाम विभागास दिली. या वेळी ग्रामस्थांनी तक्रारी न करता कामास सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डाॅ.कांतीलाल तातीया, जितेंद्र पाडवी यांनी युद्ध पातळींवर काम पूर्ण करण्याची मागणी केली. या ठिकाणी नदीवर पूल, संरक्षण भिंत, सामाजिक सभागृह, रेस्ट हाऊस, पर्यटकांना राहण्याची व्यवस्था, आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामातील चित्रीकरण अशी वेगवेगळी कामे करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिल्यामुळे साहजिकच कामास गती मिळणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या वेळी सभापती यशवंत ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वळवी, सरपंच करूनाबाई पवार, महेंद्र पवार, रतीलाल पाडवी, नारायण ठाकरे, पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी.एल. भदाने, वन क्षेत्रपाल निलेश रोहडे, सरपंच गोपी पावरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी केली रोजगाराची मागणी.
जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारुड यांनी रावलापणी येथे भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांची भेट घेवून कामास गती देण्याची मागणी केली होती. शिवाय स्थानिक ठिकाणी रोजगार नसल्याने आम्हाला सतत गुजरात येथे स्थलांतर करावे लागत असते. त्यामुळे बारमाही रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच रस्ते नसून, रस्तेही करून द्यावे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तिही तातडीने उपलब्ध करून द्या अशा वेगवेगळ्या मागण्या ग्रामस्थांनी केल्या होत्या