पी. के. अण्णा फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर; चैत्राम पवार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा गौरव
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: October 3, 2023 07:56 PM2023-10-03T19:56:41+5:302023-10-03T20:01:27+5:30
नंदुरबार : येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ...
नंदुरबार : येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावर्षी संस्था स्तरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत पुणे व व्यक्ती स्तरावर आदर्शगाव बारीपाडा येथील आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त चैत्राम देवचंद पवार यांना घोषित करण्यात आला असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील व सचिव प्रा. मकरंद पाटील यांनी दिली.
शहादा येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती व संस्थेला पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व मानचिन्ह असे आहे.
यावर्षी ९ ऑक्टोबर २०२३ रोजी संस्था स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत पुणे या दुष्काळ निवारण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेस देण्यात येणार आहे. संस्थेमार्फत ग्राम आरोग्य रक्षक प्रकल्प, विकलांग कल्याण, पढो परदेश योजना, जलयुक्त शिवार, जलसंधारण, जलस्रोत विकास आदी क्षेत्रात कार्य करण्यात येते. व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार आदर्शगाव बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त चैत्राम देवचंद पवार यांना दिला जाणार आहे. चैत्राम पवार यांनी १९९२ पासून गावकऱ्यांच्या श्रमदानातून ग्राम विकासाची लोकचळवळ उभी केली.