पी. के. अण्णा परिवर्तनवादी समाज सुधारक पुतळ्याचे अनावरण : लोणखेडा येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:29+5:302021-09-19T04:31:29+5:30
पाटीदार मंगल कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या स्मारकामुळे आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा व दिशा मिळते. स्मारक ...
पाटीदार मंगल कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या स्मारकामुळे आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा व दिशा मिळते. स्मारक हे त्या व्यक्तीने केलेल्या कार्याची तसेच त्या काळात केलेल्या संघर्षाचे प्रतीक असते. स्मारकाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. त्यांनी केलेले कार्य महान आहे ते केवळ राजकीय नेते नव्हे तर समाजसुधारक होते. पुरोगामी विचारसरणीचे सर्वकालीन श्रेष्ठ नेते आहेत. समाज सुधारणांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अनमोल आहेत. समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी धाडस लागते, त्याचप्रमाणे समाज घडवण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी या परिसरात शिक्षण संस्थाचे जाळे उभारले. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशात नावलौकिक कमावला. सहकारी संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाल्याने शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिल्याने शेतकरी सधन झाल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय संबोधनात जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, पी. के. अण्णा पाटील हे परखड व स्पष्टवक्ते होते. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात त्यांनी प्रचंड वेगाने सहकार क्षेत्रात काम केल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी सहकाराचा वटवृक्ष बहरला. राज्यात काही नवीन करायचे असेल तर त्याची सुरुवात शहाद्यातून व्हायची असा कार्यकाळ अण्णांचा होता. तापी नदीवरील २२ उपसा सिंचन योजना शेतीला पाणी मिळावे यासाठी त्यांनी सुरू केल्या. त्यांचा हा उपक्रम आदर्श मानून माझे वडील स्वर्गीय राजाराम पाटील यांनी आमच्या भागात सुरू केल्याने वाहून जाणारे पाणी शेतीला सिंचनासाठी मिळाले. जीवन कसे जगावे हे अण्णांनी आपल्याला सांगितले आहे. समाजासाठी कार्य करत असताना समाजाला काहीतरी देण्याची मानसिकता हवी हा महत्त्वाचा मूलमंत्र अण्णांनी सर्वांना दिला असल्याचे ते म्हणाले.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, सातपुड्याच्या पायथ्याशी अण्णा साहेबांनी सहकार चळवळीचा पाया रचला. राजकारणात कसे वागावे, नेहमी स्पष्ट बोलावे व कृती करावी, नुकसान काय होईल याचा विचार न करता सरळ मार्गाने जीवन जगावे याचा आदर्श अण्णांनी घालून दिला आहे. संपूर्ण परिसरात सहकार शिक्षण क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्यावरील प्रेमामुळेच आज सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर जमले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक पी. के. अण्णा पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विजय शर्मा यांनी केले. आभार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी मानले.