नंदुरबार जिल्ह्याचा सुपुत्र झाला पालघरचा खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:01 PM2019-05-26T12:01:17+5:302019-05-26T12:01:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत नंदुरबारबरोबरच नंदुरबारचा सुपुत्र असलेले राजेंद्र धेडय़ा गावीत हेदेखील पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत नंदुरबारबरोबरच नंदुरबारचा सुपुत्र असलेले राजेंद्र धेडय़ा गावीत हेदेखील पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने नंदुरबारला दोन खासदार मिळाले आहेत.
पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत हे मूळचे उमज, ता.नंदुरबार येथील रहिवासी. व्यवसायानिमित्त ते मीरारोड (मुंबई) येथे स्थायिक झाले आहेत. मात्र त्यांची नंदुरबार ही जन्मभूमी असल्याने याच भागातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली. आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आदिवासी तरुणांचे विविध प्रश्न त्यांनी सोडविले. त्याचबरोबर सामाजिक कार्यातही त्यांनी पुढाकार घेऊन या भागात विविध उपक्रम राबवले होते. नंदुरबारमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पालघरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पहिल्यांदा पराभूत झाल्यानंतर दुस:यांदा ते विजयी झाले. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये त्यांना आदिवासी विकास राज्यमंत्रीपदही मिळाले होते. पुढे पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऐनवेळी त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यातही ते विजयी झाले होते. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांची बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्याशी लढत झाली. त्यात राजेंद्र गावीत यांनी पाच लाख 80 हजार 479 मते मिळवीत विजय मिळवला. 88 हजार 883 मतांची आघाडी घेत ते विजयी झाले. त्यांच्या या विजयाबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील त्यांच्या समर्थक कार्यकर्ते व मित्र परिवाराने आनंदोत्सव साजरा केला.