आरतीसह पालखी सोहळा साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 01:23 PM2020-12-29T13:23:29+5:302020-12-29T13:23:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. दत्त जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी सात वाजता आरती व पालखी सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी उत्साह राहणार नसल्याने महानुभाव पंथीय अनुयायांसह भाविकांची निराशा झाली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सारंगखेडा यात्रोत्सव रद्द केला आहे. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याचे दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन पाटील, सचिव भिक्कन पाटील व उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. मंदिर प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग नियमानुसार प्रत्येकी तीन फुटाचे अंतर ठेवत भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था केली आहे. पालखी सोहळ्यासाठी महानुभाव पंथीय अनुयायी मोजक्या संख्यने उपस्थित राहून सर्व सोपस्कार पार पाडतील. सायंकाळी आरती होऊन दत्तांचा पालखी सोहळा मंदिरापासून मुख्य बाजारपेठ, बसथांबामार्गे निघून मंदिरात त्याचा समारोप होईल. दत्तजयंती काळात गर्दी होऊ नये व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सारंगखेडा येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, १०३ पोलीस कर्मचारी, ३३ महिला पोलीस कर्मचारी, सहा होमगार्ड यांचा बंदोबस्त राहणार आहे. सारंगखेडा गावाला यामुळे पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले असून, भाविक कमी व पोलीस जास्त असे सध्याचे चित्र आहे.
आरोग्य विभागाकडून धुरळणी
सारंगखेडा ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून दत्त मंदिरापासून धुरळणी करण्यास प्रारंभ झाला. या वेळी ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील उपस्थित होते. संपूर्ण गावात धुरळणी करण्याचे नियोजन असल्याचे पाटील यांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून दोन पथके नेमण्यात आली आहेत. हॉटेल्स, खानावळ, शितपेय विक्री दुकानांवर जाऊन या पथकातील कर्मचारी तपासणी करतील. स्थानिक व्यापारी व भाविकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा यांनी दिली.
प्रशासनाकडून पाहणी
सारंगखेडा येथे श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी मंदिर परिसराची पाहणी करुन पूर्वतयारीची माहिती घेतली. पोलीस बंदोबस्त, आरोग्य विभाग व मंदिर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव भिक्कन पाटील, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, मंडळ अधिकारी जुबेर पठाण आदी उपस्थित होते.