‘ड्राय रन’ची परीक्षा पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 12:40 PM2021-01-03T12:40:39+5:302021-01-03T12:40:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, आष्टे प्राथमिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र व नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. एकूण ७४ जणांची नेमणूक त्यासाठी करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत या सराव चाचणीचा सकाळी नऊ वाजता शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. भारुड म्हणाले, ड्राय रनच्या माध्यमातून लसीकरणात येणाऱ्या अडचणी लक्षात येतील आणि त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येईल. या सराव चाचणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होईल. दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी देखील प्रशासनाने नियोजन पूर्ण केले आहे . या भागात सीएसआर निधीतून आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात लसीकरणाच्या वेळी समस्या येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील सराव चाचणीची पाहणी केली. राज्यात नंदुरबारसह पुणे, नागपूर आणि जालना या चारच जिल्ह्यांची ड्राय रनसाठी निवड करण्यात आली होती. जिल्ह्यातील तिन्ही ठिकाणी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली. वीज, इंटरनेट, सुरक्षेसोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्षाच्या तयारीचे अवलोकन यावेळी करण्यात आले.
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ड्रायरन सुरू करण्यात आले. २५ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सर्वात आधी डॉ प्रदीप गावित यांचावर ड्रायरन लसीकरणाचे प्रत्याक्षिक करण्यात आले. कोरोना लसीकरण संदर्भात केंद्र व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.