गरोदर परिचारिका करतेय रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 08:27 PM2020-04-25T20:27:49+5:302020-04-25T20:28:22+5:30
वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीच्या नैसर्गिक आपत्तीत रूग्ण सेवेला प्रधान्य देऊन तळोदा तालुक्यातील प्रतापपूर ...
वसंत मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोना महामारीच्या नैसर्गिक आपत्तीत रूग्ण सेवेला प्रधान्य देऊन तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका गरोदर असतानाही रूग्णांची तपासणी करून रूग्ण सेवा करीत आहेत. तिच्या या स्तुत्य कामाचे कौतुक केले जात आहे.
तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अश्विनी प्रताप पावरा ही महिला परिचारिका २०१७ पासून कार्यरत आहे. सध्या ही परिचारिका गरोदर आहे. तथापि, देशासह संपूर्ण जगात कोरोना या विषाणूजन्य महामारीने अक्षरश: कहर केला आहे. देशभरात दिवसागणिक रूग्ण संख्येतदेखील मोठी वाढ होत आहे. जीवघेणा रोग असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
साधा, ताप, खोकल्याचा त्रास रूग्णाला जाणवू लागला तरी रूग्णांमध्ये प्रचंड तणाव निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. प्रतापपूर आरोग्य केंद्रात अशी लक्षणे असलेले रूग्ण उपचारांसाठी दाखल होत आहेत. अशा रूग्णांची तपासणी ही परिचारिका करीत आहे. घाबरलेल्या या रूग्णांना कोरोनाबाबत माहिती देऊन त्यांना काळजी घेण्याबाबतचे समुपदेशनदेखील त्या करीत आहेत. एवढेच नव्हे तर ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या रूग्णांना पुढील तपासणीसाठी त्या आमलाड येथे पाठवित असल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर प्रत्येक रूग्णाने आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी घरात स्वच्छता पाळा, एका-एका तासाने साबणाने हात धुवा, खोकलताना व शिंकतांना तोंडाला रूमाल लावा, आपले घर परिसर स्वच्छ ठेवून घराबाहेर पडू नका. त्यामुळेच कोरोनाला प्रतिबंध घालता येईल, असा सल्लादेखील त्या रूग्णांना देत असतात. वास्तविक त्या गरोदर आहेत, असे असतांना केवळ देशासमोरील संकट लक्षात घेऊन आणि रूग्णांची सेवा करण्याच्यव हेतूने अशा परिस्थितीत काम करीत आहेत.
साहजिकच त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात असून, रूग्णांच्या काळजीबरोबरच त्या आपली काळजीदेखील घेत आहेत. सोबत आपल्या कुटुंबाचीदेखील काळजी घेत आहे. त्यांच्या रूग्णसेवेस कुटुंबाचाही प्रतिसाद मिळत असल्याचे त्या सांगतात.