शहाद्यात डेंग्यूसदृश्य रुग्णांनी खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:42 AM2017-11-15T10:42:19+5:302017-11-15T10:42:28+5:30
स्वच्छतेचा प्रश्न : सहा बालकांवर उपचार, विविध आजारांचीही लागण
Next
ल कमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील मध्यवर्ती भागात अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांची लागण होत असून, तूपबाजार व परिसरातील बालकांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बालकांवर शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून या घटनेने शहरवासीयात खळबळ उडाली आहे. परिसरातील युवकांनी पालिका कार्यालयात जावून संबंधित अधिका:यांची भेट घेऊन या परिसरात तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.शहरातील तूपबाजार, क्रांती चौक, तांबोळी गल्ली, मारवाडी गल्ली, भोई गल्ली, विठ्ठल मंदिर, खोलगल्ली आदी भागातील सांडपाणी वाहून नेणा:या गटारी तुंबल्या असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत पालिका आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी करूनही स्वच्छतेची कार्यवाही होत नसल्याने डास-मच्छरांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. 15 दिवसांपासून या भागातील बालके हिवताप, सर्दी, खोकला आदी आजारांनी त्रस्त झाले आहेत. काही बालकांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, रोहित गौरीशंकर बोरसे (नऊ), चेतन सुरेश पाटील (पाच), साई विनोद गुरव (आठ), प्राची भावसार (16), जाणवी मनोज गुरव (सात), आदित्य जैन (आठ) यांना डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे.या बालकांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियमित साफसफाई होत नसल्याने रोगराई पसरून बालकांना साथीच्या आजारांची लागण होत आहे.शहरातील ज्या भागात अस्वच्छता आहे त्या परिसरात स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाने त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी परिसरातील युवक पालिकेत दाखले झाले असता त्याठिकाणी कोणीही जबाबदार अधिकारी, पदाधिकारी त्यांना भेटला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी गेल्या 10 दिवसांपासून कार्यालयात आलेले नसून, स्वच्छता व आरोग्य विभागातील अधिकारी जागेवर उपलब्ध होत नाहीत. परिसर सफाईच्या बाबतीत दुर्लक्ष केले जात असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेकडे फॉगींग मशीन असूनही धुरळणी केली जात नसल्याने डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचा आरोप युवकांनी केला असून, औषध व धुरळीची बिले आरोग्य विभागातर्फे काढली जात असल्याचा खळबळजनक आरोपही करण्यात आला आहे. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी या गंभीर विषयाची दखल घेवून शहर स्वच्छता व आरोग्य अबाधीत राखण्यासाठी संबंधीतांना कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी पालकांच्या वतीने केली जात आहे.