स्वाईन फ्ल्यू सदृष्य आजारांचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:52 PM2018-10-20T12:52:43+5:302018-10-20T12:52:47+5:30
दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला : सिव्हीलसह खाजगी रुग्णालयातही गर्दी
नंदुरबार : शहरात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत गेल्या आठ दिवसांपासून झपाटय़ाने वाढ झाली आहे. अनेक खाजगी रुग्णालयात तसेच जिल्हा रुग्णालयात देखील या आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल दोन रुग्णांचे रक्त, लघवीचे सॅम्पल पुण्याला पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, जनतेने काळजी घ्यावी, लक्षणे आढळून आल्यास लागलीच उपचार घ्यावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी केले आहे.
वातावरणातील उष्मा आणि आद्रता वाढल्याने गेल्या आठ दिवसांपासून साथीच्या आजारांची मोठय़ा प्रमाणावर लागण झाली आहे. तीव्र ताप येणे, थकवा येणे, भूख न लागणे, खोकला आणि गळा खवखवणे आदी आजारांचे रुग्ण वाढले आहेत. नेहमीच्या साथीच्या आजाराची रुग्ण म्हणून त्याकडे पाहिले जात होते. परंतु जिल्हा आरोग्य प्रशासन आणि खाजगी डॉक्टरांना देखील शंका आल्याने काहींनी स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असल्याचे निदान करीत त्यानुसार उपचारांना सुरुवात केली. काहींचे रक्त व लघवीचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत देखील पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नवरात्रोत्सवामुळे फैलावले?
नवरात्रोत्सवात अनेकजण सुरत, अहमदाबाद, बडोदा याशिवाय पुणे येथे गेलेले होते. तेच लोकं येथे आल्यावर यात्रा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये सामिल झाल्याने साथ फैलावल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात अशा प्रकारचे लक्षणे ही वातावरणातील बदलामुळे देखील निर्माण होतात. परंतु गेल्या आठ दिवसांपासून येणा:या रुग्णांना सारखेच लक्षणे आढळून येत असल्यामुळे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी डॉक्टर देखील सतर्क झाले. त्यांनी स्वाईन फ्ल्यूवरील उपचार अशा रुग्णांवर वेळीच सुरू केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचा दावा एका खाजगी डॉक्टरांनी केला.
जिल्हा रुग्णालयातही रुग्ण
स्वाईन फ्ल्यू सदृष्य लक्षणे असलेल्या आजाराची रुग्ण जिल्हा रुग्णालयात देखील मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. दाखल रुग्णांपैकी दोन रुग्णांचे सॅम्पल पुणे येथे पाठविण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी सांगितले. अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. परंतु त्यांना ‘स्वाईन फ्ल्यू’च आहे किंवा नाही हे सॅम्पल तपासणीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. आवश्यक ती खबरदारी घ्यावी. जिल्हा रुग्णालयात आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध आहे असेही त्यांनी सांगितले.