जिल्ह्यात ६३ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:36 AM2021-01-16T04:36:27+5:302021-01-16T04:36:27+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी अतिशय उत्साहात व शांततेत मतदान झाले. त्यासाठी अनेक केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. ...
नंदुरबार : जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी अतिशय उत्साहात व शांततेत मतदान झाले. त्यासाठी अनेक केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मशीन बदलून येईपर्यंत मतदानाला व्यत्यय आला होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६.४९ टक्के मतदान झाले होते.
जिल्ह्यात शुक्रवारी ६३ ग्रामपंचायतींसाठी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी मतदानाला गर्दी दिसून आली. सकाळी पहिल्या दोन तासात साडेनऊ वाजेपर्यंत १२.६९ टक्के मतदान झाले होते. या काळात एकूण १४ हजार ११३ मतदारांनी मतदान केले. त्यात सहा हजार १४९ महिला तर सात हजार ९६४ पुरुष मतदार होते. साडेअकरा वाजेपर्यंत ३१.६९ टक्के मतदान झाले. या काळात मात्र मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. या काळात झालेल्या ३५ हजार २४९ मतदानापैकी १८ हजार २३६ महिला मतदारांनी मतदान केले होते. तर १७ हजार १३ पुरूष मतदार होते. दुपारी दीड वाजेपर्यंत ४६.८३ टक्के मतदान झाले. या काळातही मतदानासाठी महिला मतदारांची आघाडी राहिली.
दुपारी साडेतीन पर्यंत ६६.४९ टक्के मतदान झाले. साडेतीन वाजेपर्यंत झालेल्या एकूण ७३ हजार ९६४ मतदानापैकी ३७ हजार ४९२ महिला मतदारांनी तर ३६ हजार ४७२ पुरूष मतदारांनी मतदान केले होते.
तालुकानिहाय चित्र पाहिल्यास दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नवापूर तालुक्यात सर्वाधिक ८०.६७ टक्के मतदान झाले. तर अक्कलकुवा तालुक्यात ७७.८५, अक्राणी तालुक्यात ५१.९७, शहादा तालुक्यात ६५.७७, तळोदा तालुक्यात ७५.४४ आणि नंदुरबार तालुक्यात ६९.१६ टक्के मतदान झाले होते.
शेवटच्या दोन तासात प्रत्येक ठिकाणी उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न केले.
बंधारपाड्यात मशीन बंद
नवापूर तालुक्यातील बंधारपाडा ग्रामपंचायत अंतर्गत मतदान केंद्र क्रमांक दोनवर दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक ईव्हीएम मशीन बंद पडले होते. त्यामुळे साधारणत: ४० मिनिट मतदान थांबले होते. नवापूरहून ईव्हीएम मशीन बदलून आल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. या केंद्रावर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९० टक्के मतदान झाले.