सानेगुरुजींच्या पत्रांतील व्यक्तिरेखा सहा दशकांनीही भेटतात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:42 AM2018-12-24T06:42:43+5:302018-12-24T06:43:46+5:30
सानेगुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहिलेली पत्रे हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या पत्रांतील व्यक्तिरेखा आज सहा दशकांनंतरही भेटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो
- रमाकांत पाटील
नंदुरबार : सानेगुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहिलेली पत्रे हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या पत्रांतील व्यक्तिरेखा आज सहा दशकांनंतरही भेटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो, अशी प्रतिक्रिया सानेगुरुजींची पुतणी सुधाताई बोडा यांनी ‘लोकमत’कडे दिली. गुरुजींच्या आंतरभारतीच्या स्वप्नाला गती मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जून १९४९ ते जून १९५० या वर्षभराच्या काळात प्रत्येक आठवड्याला एक अशी पत्रे सानेगुरुजींनी आपली पुतणी सुधाला लिहिली होती. सध्या सुधा बडोदा येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली असून, एक व्रतस्थ जीवन त्या जगत आहेत.
‘मी १३ वर्षांची असतानाच अण्णा गेले. तत्पूर्वी ते भूमिगत व कारावासातच होते. १९४८ ते १९५० या काळात त्यांचा काही काळ सहवास लाभला. मात्र, याही काळात त्यांच्या जेवढा काळ ते घरी असायचे, त्या काळातही घरी होणाºया बैठका, नियोजन, भेटीसाठी येणाºयांचा राबता, यामुळे खूप कमी त्यांच्याशी संवाद साधता आले, पण त्यांची पत्रे आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा राहिला. या पत्रात त्या-त्या काळाचे अनेकांचे संदर्भही आहेत,’ असे सुधाताई यांनी सांगितले.
गेल्याच वर्षी आपण कर्नाटकातील गदगला गेलो होतो. गुरुजींनी १० जून १९५० ला शेवटचे पत्र लिहिले होते. त्यात गदग, धारवड, हुबळीबाबत लिहिले होते. तेथे गेल्यानंतर गुरुजींनी ज्या डॉ. अण्णासाहेब चाफेकरांबद्दल लिहीले होते, त्यांच्या घरी आपण गेलो. त्याच गावातील ज्या मंदिराचे वर्णन गुरुजींनी केले होते त्या मंदिरातील पुजाºयाला भेटता आले. अशा कितीतरी व्यक्तीरेखा पुन्हा भेटतात, असेही त्या म्हणाल्या.
‘श्यामची आई’ जपानी भाषेतही
माझ्या नातीची मैत्रीण बंगळुरू येथे शिक्षण घेत आहे. तिच्या शाळेत जपानी मुलगी शिक्षण घेत होती. जपानच्या शिक्षिका शोकोनाका गावा यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक जापानी भाषेत छापून जपानमध्ये लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे पुस्तक जपानच्या अनेक कुटुंबांमध्ये संस्कार रुजविण्याचे काम करीत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. अशा बाबी जेव्हा आपल्याला कळतात, तेव्हा खरोखरच मनाला खूप खूप आनंद होतो, असेही त्या म्हणाल्या.