योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांचे आयुष्य बदलले : डॉ़ हीना गावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:32 PM2019-03-01T12:32:03+5:302019-03-01T12:32:35+5:30
खासदार डॉ.हीना गावीत : स्थलांतर रोखण्याला राहणार सर्वोच्च प्राधान्य
नंदुरबार : वैयक्तिक लाभाच्या ७ योजनांची प्रभावी अंमलबजावणी मतदारसंघातील ८ तालुक्यांमध्ये केल्याने नागरिकांचे आयुष्य बदलता आले, याचे समाधान असल्याची भावना नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ.हीना गावीत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.हीना गावीत या भाजपाच्या खासदार पुन्हा एकदा उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. पाच वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरी, भविष्यातील योजना यासंबंधी त्यांनी मनमोकळी चर्चा केली.
प्रश्न : उज्ज्वला योजनेचा लाभ आदिवासी महिलांना किती प्रमाणात मिळाला?
डॉ.हीना गावीत : या पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही १.५० लाख गॅस कनेक्शन या योजनेच्या माध्यमातून दिले. २०१४ पर्यंत २७ टक्के लोकांकडे गॅस कनेक्शन होते. आम्ही प्रयत्न करून मतदारसंघातील प्रत्येक गावात ही योजना पोहोचवली. विशेष म्हणजे, ६७ टक्के महिलांनी दुसऱ्यांदा सिलिंडर घेतले आहे. याचा अर्थ त्या योजनेच्या पूर्ण लाभार्थी आहेत. महिलांच्या नावे बँकेत स्वतंत्र खाते उघडले, त्यामुळे सबसिडी त्या खात्यात जमा होऊ लागली. जंगलतोड कमी झाली आणि धुरापासून सुटका झाली हे दोन प्रमुख फायदे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे झाले.
प्रश्न : ग्रामस्वराज अभियानाचा आदिवासी बांधवांना मोठा लाभ झाला आहे?
डॉ.हीना गावीत : खरंय ते. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करताना आदिवासी बांधवांकडे आधार कार्ड, रेशनकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. ही कागदपत्रे नसल्याने त्यांना योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. त्यामुळे अडीच महिन्यात एक हजार गावांमध्ये आम्ही शिबिरे घेतली. ४ लाख लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला. जिल्हा प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले.
प्रश्न : नंदुरबार जिल्ह्यावरील कुपोषणाचा डाग अद्याप मिटलेला नाही? काय अडचणी आहेत त्यात?
डॉ.हीना गावीत : मी स्वत: वैद्यकीय व्यावसायिक आहे. खासदार होण्यापूर्वी मी आरोग्य शिबिरे घेतली आहेत. कुपोषणाचा डाग मिटविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, स्थलांतर ही मोठी अडचण त्यात आहे. पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास स्थलांतर रोखता येईल. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही सूक्ष्म नियोजन सुरू केले. धडगाव तालुक्यात वनबंधू कल्याण योजनेचा पथदर्शी प्रकल्प राबविला. आरोग्य केंद्रे आहेत, पण तेथे वैद्यकीय अधिकारी नाहीत. अधिकारी का नाही, तर त्या गावात पायाभूत सुविधा नाहीत. म्हणून पंतप्रधान ग्रामसडक योजनेत १३ नवीन रस्ते मंजूर केले. आंब्याचे मोठे उत्पादन असल्याने आमचूर बनविण्यासाठी २१८ महिला बचत गटांना सोलर ड्रायर सिस्टिम दिली. कुक्कुटपालनासाठी प्रत्येक लाभार्थीला ४५ पिल्ले दिली. महूच्या फुलांपासून ज्युस आणि जॅम बनविण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत. ‘आत्मा’ अंतर्गत तांदूळ प्रक्रिया केंद्र ११ ठिकाणी उभारण्यात येत आहेत.
प्रश्न : प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती कशी आहे?
डॉ.हीना गावीत : ३१ मार्च २०१९ पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट होते. त्यानुसार ८६ गावे आणि ७६३ पाड्यांमधील एक लाख २५ हजार घरांपर्यंत आम्ही वीज पोहोचविली आहे. त्यापैकी वनविभागाच्या जमिनीमुळे २५ हजार घरांमध्ये सौर दिवे आम्ही दिले आहेत.
प्रश्न : रेल्वेच्या प्रश्नासंबंधी काय प्रयत्न झाले?
डॉ.हीना गावीत : रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईसाठी स्वतंत्र गाडी सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. सोयीची वेळ असल्याने या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. दोन गाड्यांना नंदुरबार येथे थांबा मिळवून देण्यात यश आले.
प्रश्न : चारवेळा तुम्हाला संसदरत्न पुरस्कार मिळाला, ही तुमच्या कामगिरीची पावतीच म्हणायला हवी, नाही का?
डॉ.हीना गावीत : संसदेत मी १०७८ प्रश्न विचारले. महत्त्वाच्या योजना, विधेयक मंजुरीच्या प्रक्रियेत मी होते. त्या कामगिरीचा हा सन्मान आहे.