जनधनचे पैसे आता गावातच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:40 PM2020-04-19T12:40:28+5:302020-04-19T12:40:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात पुढील दोन महिने ५०० रुपये अनुदान ...

People's money will now be available in the village | जनधनचे पैसे आता गावातच मिळणार

जनधनचे पैसे आता गावातच मिळणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात पुढील दोन महिने ५०० रुपये अनुदान जमा होणार असून प्रत्येक महिन्यात जमा होणारी रक्कम त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या १५० व बँक अधिकृत ग्राहक सेवेचे १७२ केंद्राद्वारे घरपोच मिळणार आहे.
योजनेअंतर्गत जनधन बँक खातेधारक महिलांना एप्रिल महिन्याचे अनुदान वितरीत करण्यात आले असून मे आणि जून महिन्यातदेखील अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून बँकेतील गर्दी टाळणे आवश्यक असल्याने प्रशासनामार्फत सर्व इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर व शहरात वॉर्डनिहाय सेवा देण्यात येत आहे.
जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकची १५० सेवा केंद्र आहेत. तसेच बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांची संख्या १७२ आहे. या सर्वांची यादी तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांचेकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील व वॉडार्तील लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पैसे वाटपाचे वेळापत्रक ठरविण्यात येईल. ग्राहकांना जाहीर दवंडीद्वारे पैसे मिळण्याचा दिवस कळविण्यात येईल. कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत आधार लिंक खाते असलेले सर्व ग्राहक या दोन्ही सेवांच्या माध्यमातून पैसे काढू शकतात. त्यासाठी ग्राहकांनी आपले आधार कार्ड आणि मोबाईल सोबत न्यावे. ग्राहकांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नसल्याने त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहे. धुळे-नंदुरबार पोस्टाचे वरीष्ठ अधीक्षक अनंत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट पेमेंटचे काम होणार आहे. पैसे वाटप करताना एकावेळी ४ ते ५ ग्राहकांना परवानगी देण्यात येईल व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल.
ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांना काऊंटरपासून एक मीटर दूर उभे रहावे. ग्राहक सेवा केंद्रांना आपली यंत्रे वेळोवेळी स्वच्छ करण्याच्या आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खातेधारक ग्राहकांना या सेवा केंद्रातून पैसे काढण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. एकावेळी जास्तीत जास्त हजार रुपये काढता येतील. जिल्हास्तरावर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे प्रमोद पाटील आणि पोस्ट पेमेंट बँक व्यवस्थापक योगेश शिंदे हे काम पाहतील. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन बँकेतील गर्दी टाळावी. जवळील पोस्ट कार्यालय व बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांचा वेळ व श्रम वाचावे आणि बँकेतील गर्दी टाळण्यासाठी अशाप्रकारचे नियोजन करती आहोत. ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य माहिती देण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मोठे गाव असल्यास एकापेक्षा जास्त प्रतिनिधी पाठविण्याची व्यवस्था करण्याच्या सुचनादेखील पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत व्यापारी बँकेमार्फत २ कोटी ३ लाख रुपये पोस्ट पेमेंटद्वारे वितरीत.
पोस्ट पेमेंट बँकेची सुविधा असलेल्या ठिकाणी व परिसरातील ३ ते ४ इतर गावात वेळापत्रकानुसार अनुदान वितरण होणार.
इंटरनेट कनेक्टीव्हीटी असलेल्या गावात सुविधा.
तलाठी, ग्रामसेवक एका दिवसातील लाभार्थी संख्या ठरविणार.
एका दिवसात एका प्रतिनिधीकडून जास्तीत जास्त २५ हजार रुपयांचे वाटप.
लाभार्थी पुर्ण होईपर्यंत संबधित गावात वितरण सुरू राहाणार.
मोठे गाव असल्यास एकापेक्षा अधिक प्रतिनीधीचे नियोजन.
एका ग्राहक सेवा केंद्राला (टच पॉईंट) तीन ते चार गाव जोडणार.
ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेने निश्चित केलेल्या जागेवर वितरण होणार.

Web Title: People's money will now be available in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.