पाळण्यांना नाकारली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:14 PM2019-10-03T12:14:30+5:302019-10-03T12:14:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नवरात्रोत्सवनिमित्त शहाद्यातील प्रेस मारुती मंदिरासमोरील मैदानावर यात्रा सुरू आहे. परंतु अतिवृष्टीमुळे त्या जागेवर अधिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नवरात्रोत्सवनिमित्त शहाद्यातील प्रेस मारुती मंदिरासमोरील मैदानावर यात्रा सुरू आहे. परंतु अतिवृष्टीमुळे त्या जागेवर अधिक काळ पाणी साचल्याने ती जागा पाणथळ तथा ओलसर झाली असून तेथे मोठी पाळणे उभारणे धोक्याचे ठरते. त्यासाठी मोठय़ा पाळण्यास पालिकेने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे काही व्यावसायिकांसाठी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी भाविकांच्या दृष्टीने पालिकेचा निर्णय योग्यही ठरत आहे.
या वर्षी शहादा शहर व परिसरात वरूणराजाने चांगलीच कृपादृष्टी ठेवली आहे. अनेक वर्षापेक्षा यंदा पावसाने उच्चांक गाठला असून अजुनही पाऊस सुरुच आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील प्रेस मारुती मंदिरासमोरील पालिकेच्या नियोजित ट्रक टर्मिनल जागेवर पाणी साचल्याने आजही ही जागा चिखलाने भरलेली आहे. ओलसरपणामुळे तेथे मोठ-मोठी पाळणे उभारणे हे भाविकांसाठी धोक्याची ठरत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनामार्फत पालख्या व पाळणे उभारण्यास परवानगी नाकरण्यात आली आहे.
नवरात्रोत्सव सुरु होताच पाळणा व्यावसायिकांना व्यवसायाची संधी मिळते, पर्यायाने उदरनिर्वाहाचे साधनच उपलब्ध होत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहाद्यात दोंडाईचा रोडवरील प्रेस मारुती मैदानावर यात्रा भरविण्यात येत आहे. या यात्रेत मोठ-मोठी पाळणे व अन्य व्यावसायिक दाखल झाले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही या यात्रेत आर्थिक उलाढालही होत असल्याने बाहेरुन येणा:या बहुतांश व्यवसायिकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झाले आहेत. परंतु अनेक दिवसांपासून पाणी साचल्यामुळे तेथील जागा पाणथळ बनली असून आजही काही प्रमाणात तेथे पाणी साचलेलेच आहे. त्यामुळे मोठय़ा पाळण्यांसाठी ती जागा अयोग्यच ठरत आहे. शिवाय चिखलाचे प्रमाण अधिक असल्याने ऐन गर्दीच्या वेळेस अपघाताची शक्यता नाकारताही येत नाही. हे लक्षात घेत संभाव्य अपघात टाळण्यासाठी पाळणे उभारण्यासाठी व्यावसायिकांना परवानगी नाकारण्यात आल्याचे पालिका प्रशासनामार्फत म्हटले जात आहे.