तळोद्यात दुचाकीच्या धडकेत मयत झालेला व्यक्ती निघाला उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:03 PM2020-12-11T13:03:44+5:302020-12-11T13:05:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरातील खटाईमाता मंदिराजवळ दुचाकी अंगावर चालून गेल्याने एकाचा मृत्यू झाला होता. बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा शहरातील खटाईमाता मंदिराजवळ दुचाकी अंगावर चालून गेल्याने एकाचा मृत्यू झाला होता. बुधवारी रात्री घडलेल्या घटनेतील मयताची ओळख पटत नसल्याने पोलीस चहू बाजूने दुचाकीस्वार व मयत यांचा शोध घेत होता. यात दुचाकीस्वार हा अल्पवयीन तर मयत हा तोलाचापाडा ता. तळाेदा गावाचा उपसरपंच असल्याचे समाेर आले आहे.
मानसिंग रित्या पाडवी (४०) रा. तोलाचापाडा असे मयताचे नाव आहे. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एमएच ३९ एई -०७५९ ही दुचाकी डोक्यावर चालून गेल्याने मानसिंग पाडवी यांचा मृत्यू झाला होता. तळोदा शहरातील अक्कलकुवा बायपास परिसरातील खटाई मंदिराजवळील रस्त्यावर हा अपघात घडला होता. याप्रकरणी तळोद्याचे पोलीस पाटील बापू नारायण पाटील यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चिनोदा येथील अल्पवयीन दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीस्वार भरधाव वेगात बायपास रोडकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मानसिंग पाडवी हे त्याठिकाणी आधीपासून रक्ताळलेल्या अवस्थेत पडून असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान बुधवारी रात्री अपघात घडल्यानंतर मयत मानसिंग पाडवी यांची ओळख पटवण्यासाठी पोलीसांची मोठी धावपळ उडाली. अखेर गुरूवारी दुपारी चार वाजता मयत तोलाचापाडा गावचे उपसरपंच असल्याचे उजेडात आल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना संपर्क करुन माहिती देण्यात आली.