बांधकामाला कुणी जागा देता का जागा
By admin | Published: February 28, 2017 12:38 AM2017-02-28T00:38:58+5:302017-02-28T00:38:58+5:30
आरोग्य व उपकेंद्रांची स्थिती : १५ ठिकाणच्या बिकट अवस्थमुळे आरोग्य सेवेवर परिणाम
नंदुरबार _ आरोग्य उपकेंद्रांसाठी कुणी जागा देता का जागा... असे म्हणण्याची वेळ जिल्हा आरोग्य विभागावर आली आहे. उपकेंद्रांसाठी ११ ठिकाणी आणि आरोग्य केंद्रांसाठी चार ठिकाणी जागाच उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. याशिवाय तब्बल ३० ठिकाणी तर इमारतीच नसल्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.
जिल्ह्यात आधीच आरोग्याचे तीनतेरा वाजलेले आहेत. ग्रामिण व दुर्गम भागात नागरिकांना शासकीय आरोग्य सेवेचा आसरा असतो. परंतु तीच सेवा विविध कारणांनी कोलमडलेली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ३० ठिकाणी आरोग्य उपकेंद्रांना इमारतीच नाहीत तर त्यापैकी ११ ठिकाणी जागाच उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. याशिवाय नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या सहा आरोग्य केंद्रांपैकी चार आरोग्य केंद्रांनादेखील बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य आणि बांधकाम विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यात ५८ आरोग्य केंद्र आणि २९० उपकेंद्रांद्वारे आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आदिवासी दुर्गम भागात आरोग्य सेवा वेळेवर आणि नियमित पोहचविली जात नसल्याची तक्रार नेहमीचीच आहे. त्यामुळेच अर्भक व बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण, सिकलसेल यांचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेता आरोग्य सेवा अधिकाधिक विस्तारित करण्याची योजना शासनाची आहे. त्यासाठी नव्याने सहा आरोग्य केंद्र आणि जवळपास ८० उपकेंद्रांना नव्याने मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी अनेक उपकेंद्र कार्यान्वित झाले असले तरी ते भाड्याच्या इमारतीत किंवा कुडाच्या घरात सुरू आहेत. काही ठिकाणी वन विभागाची अडचण तर काही ठिकाणी गावठाणात जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे इमारती बांधल्या जात नसल्याची स्थिती आहे.
पर्यायी मार्ग काढावा
आरोग्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग काढण्याची गरज आहे. दुर्गम व आदिवासी भागात वन विभागाचा अडसर येतो. काही गावे ही वनगावे आहेत. त्यांना महसूल गावांचा दर्जा जाहीर झाला असला तरी प्रक्रिया मात्र पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अशा गावांमध्ये मंजूर असलेली आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागते.
३० ठिकाणी इमारती नाहीत
काही ठिकाणी जागा उपलब्ध आहेत तर इमारती नाहीत अशी स्थितीदेखील आहे. त्यात शहादा तालुक्यातील पिंप्राणी, खरगोन, कुरंगी, लंगडी-भवानी, वाघर्डे, काकर्दाखुर्द, नवापूर तालुक्यातील नांदवन, खोलविहीर, सोनपाडा, लक्कडकोट, तारापूर, भांगरापाडा, बारी. नंदुरबार तालुक्यातील मालपूर, भांगडा, शेजवे, आराळे, घोटाणे, नाशिंदे. तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण, रामपूर, मालदा, जुवानी, रांझणी, आलवान, रोझवा प्लॉट, अमोणी, धडगाव तालुक्यातील हातधुई, मोख, केलापाणी या ठिकाणांच्या समावेश आहे.
दरम्यान, येत्या आर्थिक वर्षात इमारती बांधकामाला प्राधान्य राहणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.