पिण्याच्या पाण्याअभावी भाविकांचे हाल : कोचरा माता मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:43 PM2018-03-04T12:43:02+5:302018-03-04T12:43:02+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 4 : शहादा तालुक्यातील कोचरा येथील कोचरा माता मंदिरावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने भाविकांचे हाल होतात. कोचरामाता देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे नवस फेडण्यासाठी भाविकांची कायम गर्दी असते.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कोचरा येथे कोचरा मातेचे प्राचीन मंदिर आहे. वर्षातून आठ महिने या मंदिरावर मंगळवार व शुक्रवारी नवस फेडण्याचे कार्यक्रम होतात. ज्यांचा नवस मानलेला असतो त्यांच्याकडून येथे कुटुंबासह नातेवाईक, आप्तेष्ट व मित्र परिवाराला भोजन दिले जाते. गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील भाविकांची या मंदिरावर दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी नेहमी गर्दी असते. मात्र याठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने लांब अंतरावरून येणा:या भाविकांचे हाल होतात. येथे आल्यानंतर भाविकांना आधी पाण्याची व्यवस्था करावी लागते. याठिकाणी जुनी पाण्याची टाकी निकामी ठरली असून नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. मात्र या टाकीची क्षमता फक्त दोन हजार लीटर पाण्याची आहे. याशिवाय एक जुनाट हातपंप आहे. या हातपंपातून पाणी काढण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतात. येथे येणा:या भाविकांची संख्या चार ते पाच हजार असून पाण्याची टाकी मात्र फक्त दोन हजार लीटर क्षमतेची असल्याने या टाकीतील पाणी पुरत नाही. त्यामुळे भाविकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जाते.
पाण्याच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र कूपनलिका आहे. मात्र विजेचे लोडशेडींग जर दिवसा राहिले तर ही कुपनलिकाही निरुपयोगी ठरते. त्यामुळे याठिकाणी येणा:या भाविकांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.