संशयित आणि बाधितांना एकच वाॅर्डात ठेवल्याने होवू लागली आबाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 01:15 PM2020-12-03T13:15:30+5:302020-12-03T13:15:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता सहा हजार झाली आहे. बाधित रुग्णाची चाचणी येण्यापूर्वी त्याच्यावर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता सहा हजार झाली आहे. बाधित रुग्णाची चाचणी येण्यापूर्वी त्याच्यावर संशयित म्हणून उपचार करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातही कोरोना रुग्णांप्रमाणेच उपचार दिले जात असले तरी रुग्णांना स्वत:ची कामे स्वत: करावी लागत असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांच्या उपचारात खंड न पडू देता त्यांना थेट कोरोना रुग्णांना दिली जाणारी वैद्यकीय सुविधा व सेवा देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यांतर्गत जिल्हा रुग्णालयात नेत्र कक्ष व महिला रुग्णालयात प्रत्येकी १० बेड हे संशयित रुग्णांना देण्यात आले आहेत. हे दोन्ही वाॅर्ड स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी सध्या चारच संशयित रुग्ण असल्याची माहिती समाेर आली आहे. जिल्हा रुग्णालयातून कोरोना संशयित म्हणून उपचार घेतलेल्या एकासह दाखल असलेल्या दोघांसोबत संवाद साधला असता, कोरोनाची चाचणी येईपर्यंत अनेकविध अडचणी असल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने गोळ्या औषधी तसेच इतर अनेक बाबींसाठी वाट बघावी लागत असल्याचे समाेर आले. सध्या स्टाफ कमी असल्याने वेळेवर मदत मिळत नसल्याचे त्यांच्यांकडून सांगण्यात आले. यात सुधारण करण्याची अपेक्षा संशयित रुग्णांकडून वर्तवण्यात आली.
अहवाल लवकर मिळावा
कोरोनाची सामान्य लक्षणे असल्याने दक्षता म्हणून दाखल झालो होतो. रुग्णालयात सुविधा चांगल्या आहेत. परंतू ब-याच वेळा संशयित असल्याने रिपोर्ट येईल तोवर उपचार थांबवण्यात आले होते. त्रास कोरोनासारखाच असल्याने त्यावर उपचार होणे आवश्यक होते. रिपोर्ट आल्यानंतर मात्र तातडीने उपचार सुरू करण्यात आले. निगेटिव्ह रिपोर्ट आलेले घरी सोडले.
(कोरोना संशयित बरा झालेला रुग्ण )
सुविधा द्यायला हव्यात
महिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. परंतू त्याठिकाणी बेडशीट, चादर या वस्तू उशिराने मिळत आहेत. कोरोना वाॅर्ड जवळ असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. तेथे काम करणारेच कर्मचारी या वाॅर्डात येतात. त्याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. वाॅर्डासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त व्हावेत
(संशयित रुग्ण)
वेगळा कक्ष पाहिजे
कोरोना वाॅर्डाला लागूनच संशयित रुग्णांना ठेवण्यात येते. यातून काहींना कोरोना नाही केवळ लक्षणे आहेत. यातून कोरोना नसलेल्या व्यक्तीलाही कोरोना होवू शकतो. आधीच कोरोना वाॅर्डातील गंभीर रुग्णांची स्थिती पाहून भिती असते. त्यात याच भागात संशयित रुग्णांचा वाॅर्ड असल्यास मानसिकता खालावण्याची शक्यता असते. म्हणून हे वाॅर्ड दुसरीकडे केले पाहिजेत.
(संशयित रुग्ण)
संशयित रुग्णाचा आरटीपीसीआर रिपोर्ट येण्यापूर्वीच त्याच्यावर उपचार सुरू केले जातात. कोरोनाप्रमाणेच त्यांच्यावर उपचार सुरू असतात. अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास तातडीने त्याला पुढील उपचार देण्याचे नियाेजन करण्यात येते. एखाद्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याला सामान्य कक्षात हलवून त्याच्या उपचारांची माहिती संकलित करण्यात येते. व पुढील उपचार कसे घ्यावेत याची माहिती दिली जाते.
-डाॅ. के.डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.