झाडांची कत्तल केली, पण पर्यायी वृक्ष लागवड कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:29 PM2018-12-17T12:29:22+5:302018-12-17T12:29:26+5:30
महामार्गाचे नूतनीकरण : काम सुरू असतानाच वृक्ष लागवडीची मोहीमही राबवावी
नंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा महामार्गाच्या नूतनीकरणासाठी अडीच हजारावर वृक्षांची कत्तल करण्यात आली. परंतु त्या मोबदल्यात राबवायची वृक्ष लागवड मोहीम संबंधित ठेकेदाराने अद्यापही सुरू न केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नव्हे तर यंदाच्या दुष्काळी स्थितीला काहीअंशी ही घटनाही जबाबदार असल्याचे बोलले जात असून आतापासूनच वृक्ष लागवड मोहीम सुरू करण्याचा सूर व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातून विसरवाडी-सेंधवा हा महामार्ग जात असून त्यासाठी रस्त्यावर असलेल्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करण्यात आली. अगदी 50 वर्षाहून जास्त वयाची मोठमोठे वृक्षही तोडली गेली. वास्तविक मुळासकट वृक्ष काढून तो जसाच्या तसा दुस:या ठिकाणी लागवड करण्याचे तंत्र विकसीत झाले असले तरी तो पर्याय न वापरता या महामार्गाच्या कामासाठी झाडे तोडण्यात आली. आज या घटनेला दोन वर्षे झाली. महामार्गाचे कामही अतिशय संथगतीने सुरू आहे. सद्यस्थितीत या महामार्गावर कोळदा ते कोरीट फाटार्पयत काम झाले आहे. त्यातही मध्ये लहान शहादेजवळ जवळपास एक किलोमीटर व कोरीट फाटय़ाच्या अलिकडे अर्धा किलोमीटर काम अपूर्णच आहे. पुढे प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान दोन किलोमीटर काम झाले आहे. शहाद्यापासून पुढे टप्प्याटप्प्यात कामे सुरू असल्याने हा रस्ताच रहदारीसाठी अडथळ्याचा ठरला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी सर्वात त्रासदायक रस्ता झाला आहे. याबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे वृक्ष लागवडीबाबतही बेपर्वाई केली जात आहे. ज्या भागात रस्ता झाला किंवा ज्याठिकाणी जमीन संपादीत झाली अशा भागात वृक्ष लागवड वेळीच सुरू होणे आवश्यक आहे. एका झाडाच्या बदल्यात पाच वृक्ष लागवड करण्याचे बंधन आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने आताच मोठे रोप आणून त्याची लागवड केली तर सध्या रस्त्यावर पाणी मारण्याची कामे सुरू असल्याने झाडांनाही वेळेवर पाणी दिले जाईल. शिवाय त्याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे वृक्षांचे संगोपनही होईल, अशा प्रतिक्रिया लोकांमध्ये व्यक्त होत आहेत.
परंतु याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनीही बेफिकीरीची भूमिका घेतल्याने या रस्त्यावरील वृक्षतोड झालेल्या वृक्षांच्या बदल्यात पर्यायी वृक्षारोपण होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आज या रस्त्यावर सावलीसाठीही वृक्ष सापडणे दुर्मीळ झाल्याने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.