प्रादेशिक कलांवत कला समृद्धीचा महत्त्वाचा ‘दुवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:12 PM2020-01-05T12:12:16+5:302020-01-05T12:30:00+5:30
संडे स्पेशल मुलाखत सातपुड्यातील भाषा आणि संस्कृती समृद्ध आहे़ कलारुपाने भाषेची मांडणी झाल्यास नंदुरबारात नाट्यकलेचा नवा अध्याय सुरु होईल-दत्ता पाटील
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आदिवासी संस्कृती ही जगाला ज्ञान देणारी आहे़ भाषासमृद्ध असल्याने येथे कलावंत घडवताना स्थानिक बोलीभाषेचा वापर झाला पाहिजे़ जिभाऊ करंडक स्पर्धा ही या साठी मोठं व्यासपीठ असून येत्या काळात येथील कलावंतांसाठी नाट्यलेखन करुन त्यांना सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी केले़ त्यांच्याशी केलेली ही बातचीत़
प्रश्न : नाटकासाठी शुद्ध भाषेचा अट्टाहास योग्य आहे का?
उत्तर : नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे़ येथे एकापेक्षा अधिक भाषा आहेत़ हीच गत संपूर्ण खान्देशाची आहे़ भाषेचा हा लहेजा वापरुन अनेकांनी नाट्यस्पर्धेत यशही मिळवले आहे़ शुद्ध मराठी भाषा येत नाही, म्हणून त्यांनी त्यांच्यातला कलावंत किंवा लेखक का थांबवावा, इथल्या मुलांनी खरतंर आपली स्पंदने टिपून ती जगासमोर आपल्या भाषेत मांडणे गरजेचे आहे़ आपले प्रश्न हे कलेच्या माध्यमातून मांडता येतात़ शेतकरी आणि सामान्यांची मुलं त्या समस्या स्थानिक भाषेतून मांडून त्या अधिक ज्वलंतर करु शकतील़ यासाठी शुद्ध भाषा हा काही योग्य पर्याय नाही़
प्रश्न : नाट्यलेखन किंवा कलावंतांची नवीन पिढी घडवण्यासाठी काय करायला हवं़ ?
उत्तर : नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात १ स्पर्धा सतत १० वर्ष चालणं हेच याचं उत्तर आहे़ स्पर्धा असली की मग मुलांचा त्यात सहभाग वाढतो आणि यातून कलावंत घडवण्यास मदत होते़ प्रायोगिक रंगभूमी ही फक्त काही पुण्या-मुंबईपुरती मर्यादित नाही़ कलेच्या कक्षा ह्या अमर्याद असतात़ यातून त्या येथेपर्यंत पोहोचल्या आहेत़ नव्या कलावंतांनी आपले सामाजिक प्रश्न समजून घेत त्यावर विचार वाढवणे गरजेचं आहे़ सुरुवातच बाहेरच्या विषय घेऊन केल्यास प्रवास खुंटण्याची भिती असते़ नाशिक सारख्या छोट्या शहरातून नाट्यलेखक म्हणून भरारी घेताना मर्यादा होत्या़ परंतू तेथे सुरु झालेल्या स्पर्धांनी खरं बळ मिळालं, लिहिण्याची उर्मी मिळाल्यानेच इथवरचा प्रवास झाला़