रस्त्याअभावी बेडवाई ग्रामस्थांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:36 AM2021-09-17T04:36:20+5:302021-09-17T04:36:20+5:30
बेडवाई येथील ग्रामस्थांना खर्डी येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते. खर्डी येथे पायपीट करीत येऊन मिळणारे रेशनचे धान्य डोक्यावर ...
बेडवाई येथील ग्रामस्थांना खर्डी येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते. खर्डी येथे पायपीट करीत येऊन मिळणारे रेशनचे धान्य डोक्यावर घेऊन पुन्हा त्याच खडतर वाटेने घर गाठण्यासाठी मार्गक्रमण करावे लागते. यात कधी-कधी लहान चिमुकले मुले मागे लागतात. आई-वडिलांच्या डोक्यावरील ओझे स्वत:च्या डोक्यावर घेत ही मुलेही नदीतील दगड-गोट्यांमधून व चढ-उताराच्या रस्त्याने ये-जा करतात. डोक्यावरील ओझे जड वाटल्यास पायवाटेत मध्येच विश्रांती घेत घराच्या रस्त्याला लागतात.
खर्डी येथील स्वस्त धान्य दुकानातून बेडवाई (विहिरीमाळ) ग्रामस्थांना रेशन मिळते. येथील ग्रामस्थांसाठी दळणवळणाच्या सुविधा नसल्याने डोक्यावरूनच ओझे वाहून न्यावे लागते. त्यातच मध्ये येणाऱ्या नदीला पूर राहिला तर संपर्क तुटतो. नदीचे पाणी कमी झाल्यावर येथील ग्रामस्थांना ये-जा करावी लागते. आवश्यक कामासाठी कधी-कधी पुरातूनही नदी पार करावी लागते. अशावेळी काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवालही येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे बेडवाई येथून खर्डीपर्यंत जाण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालून दळणवळणासाठी रस्ता तयार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.