वेलदा येथे जमावाकडून पोलिसांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:16 PM2020-07-22T12:16:09+5:302020-07-22T12:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्टÑाच्या सीमेलगतच असलेल्या गुजरातमधील वेलदा, ता.निझर येथे जमावाकडून खाजगी दवाखान्याच्या साहित्याची भरचौकात जाळपोळ करण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्टÑाच्या सीमेलगतच असलेल्या गुजरातमधील वेलदा, ता.निझर येथे जमावाकडून खाजगी दवाखान्याच्या साहित्याची भरचौकात जाळपोळ करण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दरम्यान, घटनेच्या चौकशीसाठी आलेल्या निझर पोलीस ठाण्यातील फौजदारासह जमादारावरही जमावानेही हल्ला चढविल्याने हे दोघे जण जखमी झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरच गुजरातमधील वेलदा हे गाव आहे. याच गावातील कुकरमुंडाफळी भागातील एका वृद्धेची प्रकृती सोमवारी रात्री बिघडली होती. त्यामुळे त्या वृद्धेचे नातेवाईक रात्री एका खाजगी डॉक्टरांना उपचारासाठी घरी बोलविण्यासाठी आले होते. परंतु कोरोनाची परिस्थिती असल्याचे सांगत डॉक्टरांनी रात्री घरी जाऊन उपचार देण्यास नकार दिला. त्यामुळे वृद्धेचे नातेवाईक संतप्त झाले होते. दरम्यान, सोमवारी रात्रीच संबंधित वृद्धेचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईक व त्या भागातील रहिवासी संतापले. रात्रीच त्यांनी दवाखान्याच्या परिसरात येऊन संताप व्यक्त केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जवळपास शेकडोच्या संख्येने जमाव दवाखान्याच्या दिशेने चालून आला. दवाखाना बंद होता. त्याचे कुलूप तोडून दवाखान्यातील फर्निचर व काचेची तोडफोड केली. दवाखान्यातील साहित्य काढून ते रस्त्यावर आणले आणि रस्त्यावरच भरचौकात त्याची जाळपोळ केली. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. निझर पोलिसांना ही माहिती मिळताच फौजदार आर.एच. लोह यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विचारपूस सुरू करताच तेथेच वादावादी झाली व जमावाने पोलिसांनाही मारहाण सुरू केली. त्यामुळे फौजदार लोह यांच्यासह जमादार जयेशभाई लिलकीया हे दोघे जण जखमी झाले. त्यांना निझर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तब्बल दोन तास हा धिंगाणा वेलदा गावातील भररस्त्यावर सुरू होता. घटनेमुळे वेलदा ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेसंदर्भात निझर पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.