शेतात लावलेली गांजाची ४,७९० झाडे पोलिसांनी केली जप्त
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: April 1, 2023 07:33 PM2023-04-01T19:33:18+5:302023-04-01T19:34:13+5:30
धडगाव तालुक्यातील निगदीचा कुंड्यापाडा येथे शेतातून तब्बल ४,७९० गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली.
नंदुरबार :
धडगाव तालुक्यातील निगदीचा कुंड्यापाडा येथे शेतातून तब्बल ४,७९० गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. त्याची एकत्रित किंमत ४५ लाख ३९ हजार ६५० रुपये इतकी आहे. याबाबत धडगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपजा सिंगा पाडवी रा. निगदीचा कुंड्यापाडा, ता. धडगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांच्या पथकाने निगदीच्या कुंड्यापाडा भागात जाऊन पाहणी केली. तेथे आंब्याच्या झाडाखाली गांजांची झाडे लागवड केल्याचे दिसून आले. पोलिसांचे पथक पाहताच त्याने तेथून पळ काढला. परंतु पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. शेतात हिरवट रंगाचे गांजासदृश झाडांची लागवड केल्याचे दिसून आले, म्हणून धडगांव पोलिस ठाण्याच्या पथकाने संपूर्ण शेती पिंजून काढली. तेथे संपूर्ण शेतातून ६४८ किलो ५० ग्रॅम वजनाचे ४५ लाख ३९ हजार ५०० रुपये किमतीची एकूण ४,७९० गांजाची झाडे मिळून आली. संशयित रुपजा सिंगा पाडवी रा. निगदीचा कुंड्यापाडा ता. धडगांव याच्याविरुध्द धडगांव पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.