मुख्यमंत्र्यांच्या सभेत राजकीय भुकंप?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:30 AM2019-08-07T11:30:13+5:302019-08-07T11:30:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबारच्या सभेने 9 रोजी होणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबारच्या सभेने 9 रोजी होणार आहे. शहादा व नंदुरबार येथे त्यांची जाहीर सभा होणार असून त्यांच्या सभेत जिल्ह्यात काय राजकीय भुकंप होतो याकडे लक्ष लागून आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली आहे. यात्रेचा पहिल्या टप्प्याचा समारोप 9 ऑगस्ट रोजी नंदुरबारात होणार आहे. दुपारी दोन वाजता त्यांची बाजार समिती आवारात जाहीर सभा होणार आहे. त्याआधी सकाळी त्यांची शहादा येथे सभा होणार आहे.
9 रोजी सकाळी 9 वाजता त्यांचे सारंगखेडा येथे स्वागत होईल. तेथून ते शहादा येथे जातील. तेथे जाहीर सभेला संबोधीत करतील. त्यानंतर प्रकाशा मार्गे ते नंदुरबारात येतील. नंदुरबारातही जाहीर सभेला संबोधीत करून यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा ते समारोप करतील. नंदुरबारहून हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या तयारीसाठी भाजप सरसावली आहे. दोन्ही ठिकाणची सभा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या यात्रेदरम्यान राजकीय भुकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहादा व नंदुरबार व नवापूर येथील काँग्रेसची काही मंडळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्याची शक्यता आहे. कोणकोण भाजप प्रवेश करतो याकडे राजकीय कार्यकत्र्यासह जिल्ह्यातील जनतेचेही लक्ष लागून आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.