हालीपाडा ते तेलखेडी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:26+5:302021-07-17T04:24:26+5:30
या रस्त्यावर खड्डे पडल्याने व उखडल्याने डांबरही दिसत नाही. रस्त्याचा एका बाजूला मोठी दरी असून, दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग ...
या रस्त्यावर खड्डे पडल्याने व उखडल्याने डांबरही दिसत नाही. रस्त्याचा एका बाजूला मोठी दरी असून, दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग आहे. पावसाच्या दिवसात संपूर्ण रस्त्यावर पाणी वाहते. रस्त्यावर पाणी की पाण्यात रस्ता हेच वाहन चालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढू शकते. वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हलीपाडा, कुकलट, शिंदवाणी ते तेलखेडी पाड्याचा रस्ता वाहन चालकांना खूप मोठी कसरत करून, धडगाव शहरात यावे लागते. गेल्या काही वर्षांपासून वाहन चालकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची पाहणी करून, रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. सुरुवातीला रस्त्याच्या कडेने डोंगर भागालगत मोठी चारी करून पाण्याला मोकळी वाट करून दिली असती, तर आज रस्त्याची अशी दुरवस्था झाली नसती, असे गावातील अनेक नागरिकांनी सांगितले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून, या रस्त्याची कामे तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या रस्त्याचे कित्येक वर्षांपासून डांबरीकरण झालेले नाही. हा रस्ता पूर्ण का होत नाही, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष करीत वाहन चालकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, नाराजी व्यक्त केली जात आहे.