पॉझिटिव्हिटी आली २५ टक्क्यांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:34 PM2020-10-09T12:34:26+5:302020-10-09T12:34:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वॅब संकलन कमी होणे, त्यामुळे चाचण्या कमी होणे आणि त्याचा परिणाम कोरोना रुग्णांच्या संख्येवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वॅब संकलन कमी होणे, त्यामुळे चाचण्या कमी होणे आणि त्याचा परिणाम कोरोना रुग्णांच्या संख्येवर होत आहे. अॅक्टीव्ह पेशंटची संख्या सहाशे ते सातशेच्या दरम्यान राहत आहे. शिवाय दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या देखील ५० च्या आत राहत आहे. यामुळे मात्र शासकीय व खाजगी कोविड रुग्णालयातील बेड देखील मोठ्या संख्येने रिकामे राहत आहेत.
जिल्ह्यतील कोरोनाबाधीतांची संख्या आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तब्बल तीन ते चार पटींनी वाढली होती. त्यामुळे अवडी दीड हजार असलेली रुग्णसंख्या सप्टेंबर अखेर पाच हजाराचा आकडा पार करून गेली. परंतु आॅक्टोबर महिन्यात राबविण्यात आलेली माझे कुटंूब माझी जबाबदारी ही मोहिम हाती घेण्यात आली. त्यातून अनेकांचे स्वॅब संकलन करण्यात आले. काहींनी स्वच्छेने स्वॅब दिले तर काहींनी भितीपोटी स्वॅब दिले. त्यामुळे स्वॅब संकलन काही दिवस वाढले, नंतर मात्र पुन्हा संख्या कमी झाली.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून दीडशे ते दोनशे स्वॅब संकलन केले जात आहे. ९४ स्वॅब तपासणीची एक बॅच काढण्यात येते. दिवसातून दोन बॅच होत आहेत. त्यातून पॉझिटिव्हटीचे प्रमाण अवघे २० ते २५ टक्केवर आले आहे. पुर्वी हे प्रमाण जवळपास ५० ते ७० टक्केपर्यंत होते. त्यामुळे बाधितांची संख्या देखील वाढत होती.
- अॅक्टीव्ह पेशंट झाले कमी
- सद्या अॅक्टीव्ह पेशंटची संख्या कमालीची कमी झाली आहे. एकाच वेळी १३०० ते १६०० च्या संख्येने राहणारे अॅक्टीव्ह पेशंट आता निम्म्यावर अर्थात ६०० ते ७०० च्या संख्येवर खाली आहे. यातील ७० टक्के रुग्ण हे शासकीय व खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत तर ३० टक्के रुग्ण हे घरीच राहत उपचार घेत आहेत. परिणामी रुग्णालयांमध्ये बेड मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहत आहेत.
- प्रशासनाचा ताण कमी
- रुग्ण संख्या घटल्याने प्रशासनावरील ताण देखील कमी झाला आहे. कन्टेनमेंट झोनची संख्या कमी झाली आहे. रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींगचे प्रमाण देखील कमी झाले आहे. त्यामुळे प्रशासनातील विविध यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. अर्थात येणारा काळ कसा राहील याबाबत कुणीही शाश्वती देत नाही. त्यामुळे अजूनही प्रशासनाने अलर्ट राहून उपाययोजना कायम ठेवाव्या व यंत्रणांना सक्रीय ठेवणे आवश्यक राहणार आहे.
- नंदुरबार दोन हजाराचा टप्पा
- नंदुरबार तालुक्याने कोविड रुग्णांचा दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यतील एकुण रुग्णसंख्येपैकी तब्बल ३८ टक्के रुग्ण एकट्या नंदुरबार तालुक्यातील आहेत. याच तालुक्यात रुग्णांच मृत्यूचे अर्धशतक देखील झाले आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्वाधिक स्वॅब संकलन हे याच तालुक्यात झाले आहे. त्या खालोखाल शहादा तालुका आहे.
- २५ ते ३५ बेड रिक्त
- जिल्ह्यात खाजगी व सरकारी मिळून एकुण ९९४ बेड उपलब्ध आहे. सद्य स्थितीत त्यातील २५ ते ३५ बेड रिक्त आहेत. दाखल रुग्णांमध्ये पॉझिटिव्ह व लक्षणे असलेल्या रुग्णांचा देखील समावेश आहे. त्यामुळे बेड संख्या भरलेली आढळून येते. पूर्वी बेड मिळविण्यासाठी रुग्णांना वेटीं करावी लागत होती.
- जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा आता २५ टक्केवर आला आहे. दररोज २० च्या संख्येने शासकीय रुग्णालयात रुग्ण येत आहे.