सतर्कता म्हणून बोरद गाव ठेवले सलग तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:05 PM2020-05-11T12:05:44+5:302020-05-11T12:10:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्या पुढाकाराने सलग तीन दिवस गाव बंद ठेवण्यात आले होते़ कोरोनाची लागण झालेली वृद्ध महिला दोन महिन्यापासून बाहेरगावी असली तरी दक्षता म्हणून गावात निर्जंतुकीकरण करणे काही भाग सील केला आहे़
आष्टे ता़ नंदुरबार येथे मुक्कामी असताना वृद्धेस कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या-त्या गावांमध्ये उपाययोजना सुरु केल्या गेल्या होत्या़ या पार्श्वभूमीवर बोरद येथे सलग तीन दिवस लॉकडाऊनचे पालन करण्यात आले़ दरम्यान उपाययोजना गांभिर्याने घेतल्या जाव्यात यासाठी सरपंच वासंतीबाई ठाकरे यांनी पदाधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत सोशल डिस्टन्सिंग ठेवत बैठक घेतली होती़ यावेळी उपसरपंच रंजनकोरबाई राजपूत, ग्रामविकास अधिकारी विजय पाटील, सदस्य मंगलसिंग चव्हाण, बयसिंग पवार, मंगेश पाटील, शोभा पाटील, इंदिराबाई चव्हाण, सीताराम ठाकरे, सुरेखा ढोढरे, मनिषा पाडवी, बुध्या माळी उपस्थित होते़ तब्बल आठ हजार लोकसंख्या असलेल्या बोरद गावात दर दिवशी तळोदा आणि शहादा तालुक्यातील ३० गावांमधील ग्रामस्थ भेटी देतात़ कृषी सेवा केंद्रात खरेदीसह किराणा माल व इतर वस्तू घेण्यासाठी कायम गर्दी होते़ येथील रहिवासी महिलेस बाहेरगावी कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली होती़ ही भिती कमी होऊन दिलासा मिळावा ग्रामपंचायत प्रशासनाने गावात फिरुन माहिती दिली होती़ सोबत जागोजागी धूर फवारणी आणि निर्जंतुकीकरण केले होते़ तीन दिवसात एकही जीवनावश्यक वस्तू सोडल्यास इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते़ यातून सोशल डिस्टन्सिंग झाले आहे़ तूर्तास गावात शुकशुकाट असून १७ मे पर्यंत लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळले जातील असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे़
दरम्यान कोरोनाबाधित महिलेच्या घरातील दोघांना गुरुवारी रात्रीच क्वारंटाईन करण्यात आले आहे़ बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़ रेखा शिंदे व डॉ़योगेश पाटील यांनी कोरोना बाधित महिलेच्या कुटूंबातील दोन्ही सदस्यांची पाहणी केली होती़ दोघांना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर संपूर्ण परिसर व घर सील केले गेल्याची माहिती आहे़ गावात सर्वेक्षणालाही सुरुवात करण्यात आली असून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी हे प्रत्येक घराला भेटी देऊन माहिती घेत असल्याचे दिसून येत आहे़
गुरुवारी महिलेचा रिपोर्ट आल्यानंतर नंदुरबार व नवापुर तालुक्यात उपाययोजना सुरु झाल्या होत्या़ तळोदा तालुका प्रशासनही तातडीने अलर्ट होऊन कामाला लागले होते़ तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे यांनी वेगाने हालचाली करुन बोरद गाठले होते़ यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या़ तूर्तास बोरद व परिसरात चिंता कायम आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच रहा सुरक्षित रहा यावर भर देण्यात येत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले़