टंचाईयुक्त भागात जलयुक्तला प्राधान्य
By admin | Published: February 23, 2017 12:39 AM2017-02-23T00:39:35+5:302017-02-23T00:39:35+5:30
कार्यशाळा : गेल्या वर्षाच्या कामांचाही घेतला आढावा
नंदुरबार : ज्या गावांना पुढील काळात पाणी टंचाई जाणवेल, ज्या परिसरात भुगर्भातील पाणी पातळी खोल गेली असेल अशा गावांना जलयुक्त अंतर्गत लाभ दिला गेला पाहिजे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी जलयुक्तच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत दिल्या.
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय बैठक व कार्यशाळा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी बोलत होते. जिल्हा परिषेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे, तहसीलदार नितीन पाटील, पी.टी.बडगुजर, महेश पोतदार आदी उपस्थित होते.
सुरुवातीला गावनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. अपुर्ण असलेली कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी म्हणाले, यंदा काही भागात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे अशा भागातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक गावातील सरपंचांकडून अनेक सुचना आल्या होत्या. त्यामुळे टंचाई कृती आराखडा तयार करतांना त्या बाबींचा, सुचनांचा आढावा घेण्यास देखील सांगण्यात आले होते.
सर्वांनी वृक्ष संवर्धन, पाणी आडवा-पाणी जिरवा, जल पुनर्रभरण यासारखे प्रयोग राबविले तर परिसराचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. ज्या ठिकाणी टंचाई आहे अशा ठिकाणी कुपनलिका न करता विहिरीच खोदली पाहिजेत असेही मत त्यांनी व्यक्त केले. शिवारफेरी गावातीलच लोकांनी आयोजित केली पाहिजे. ज्या गावांना पाणी टंचाई जाणवणार अशा गावांना आपण स्वत: भेट देणार असून उपाययोजनांचा आढावा देखील घेणार आहोत.
सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी तालुक्यात निवडलेल्या गावांविषयी माहिती देत कामे, राबविण्यात येणारी यंत्रणा याविषयी देखील त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविक करणसिंग गिरासे यांनी केले.
कार्यशाळेत जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या गावांचे सरपंच, उपसरपंच, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.