तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा झाल्याचा अभिमान- पालकमंत्री रावल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:49 AM2018-10-03T11:49:04+5:302018-10-03T11:49:09+5:30
उपक्रम : सहभागी शाळा संस्थांचा झाला गौरव
नंदुरबार : तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा झाल्याची बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी गौरव समारंभात बोलतांना केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना, लायन्स क्लब, रोटरी क्लब नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार जगात तिसरा तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून नोंद होणार आहे. त्यानिमित्त या उपक्रमात योगदान देणा:यांचा गौरव समारंभाचे मंगळवारी नाटय़गृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, शिक्षणाधिकारी आर.डी.कांबळे, डॉ.राहुल चौधरी, बी.आर.रोकडे, सलाम मुंबईचे अजय पिळणकर, रोटरीचे शब्बीर मेमन, नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी, हैदर नुराणी, डॉ.तेजल चौधरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले, मं.गांधी हे जगातील मोठमोठय़ा व्यक्तींचे प्रेरणास्थान असून त्यांच्या नावाने सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान निश्चितच यशस्वी होईल. स्वच्छता मोहिमेबरोबरच तंबाखूमुक्त मोहिम राबविण्यात आली असून आज जिल्हा तंबाखुमुक्त शाळांचा जगात तिसरा जिल्हा ठरला असल्यामुळे ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी सर्वाच्या परिश्रमामुळे जिल्हा तंबाखुमुक्त झाला. जिल्हाधिका:यांनी पुढाकार घेवून ही बाब शक्य करून दाखविल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. जिल्ह्यात एक हजार 785 शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याचे नाव राज्यात निघत आहे. आता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्येही हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छता मोहिमेत देखील आता सर्वानी सहभाग घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचलन रणजीत राजपूत, डॉ.माधव कदम, वसंत पाटील यांनी केले.