‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: May 14, 2024 08:12 AM2024-05-14T08:12:02+5:302024-05-14T08:15:36+5:30
पहिले कार्ड मिळाले म्हणून सर्वच काही मिळेल, असे नव्हे. शासकीय योजनांचा लाभ घेताना आजही अनेक अडचणी येतात.
रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार: आयुष्यात दु:ख डोंगराइतके असले तरी देशातील पहिले आधार कार्ड मला तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते मिळाले होते, याचा आजही अभिमान आहे. हेच आधार कार्ड दाखवून आपण मतदान केल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया देशातील पहिले आधार कार्ड मिळालेल्या टेंभली, ता. शहादा येथील रंजना सोनवणे यांनी व्यक्त केली.
आधार कार्ड वाटपाचा शुभारंभ सप्टेंबर २०१० मध्ये टेंभली, ता. शहादा येथे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झाला होता. आधार कार्ड वाटपाचा शुभारंभ ज्यांच्यापासून झाला होता त्या रंजना सोनवणे यांनी दुपारी एक वाजता मतदान केले. मतदानानंतर त्यांनी अभिमानाने आपल्या हातातले आधार कार्ड दाखवून आनंद व्यक्त केला. रंजनाबाई यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले असून आजही मोलमजुरी करून त्यांची उपजीविका सुरू आहे. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा बी. कॉम. झाला असून दोन वर्षांपासून नोकरीच्या शोधात आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेताना अनंत अडचणी
पहिले आधार कार्ड तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते मिळाले, त्यावेळी आता आयुष्यातील माझे सर्व प्रश्न सुटतील, असे वाटले होते. पण पहिले कार्ड मिळाले म्हणून सर्वच काही मिळेल, असे नव्हे. शासकीय योजनांचा लाभ घेताना आजही अनेक अडचणी येतात. घरकूलसाठी अर्ज केला पण नामंजूर झाले. भांडी वाटप व इतर योजनांसाठी दोन-तीन वेळा चकरा मारल्या. पुन्हा पुन्हा पाठपुरावा करणे शक्य नसल्याने नाद सोडला. दु:ख कितीही असले तरी पहिले आधार कार्ड मिळाल्याचा अभिमान मात्र कायम राहणार, हे सांगताना रंजनाबाई भावुक झाल्या होत्या.