नंदुरबारचे प्राथमिक शिक्षणाधिकारी ५० हजाराची लाच घेतांना जाळ्यात
By मनोज शेलार | Published: May 15, 2024 08:24 PM2024-05-15T20:24:00+5:302024-05-15T20:24:12+5:30
ही कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरिक्षक नितीन पाटील, हवालदार चौधरी, अनिल गांगोडे,गणेश निंबाळकर यांनी केली.
नंदुरबार: हॉटेल सुरू करण्यासाठी परिसरात असलेली शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि गुजराती शाळेची आरटीई मान्यता वर्धीत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्विकारतांना प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांना त्यांच्याच कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर येथील तक्रारदार यांना हाॅटेल सुरू करावयाची होती. परंतु त्या परिसरात बंद पडलेली जिल्हा परिषद शाळेची इमारत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे मागितले होते. ते मिळावे यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांच्याकडे अर्ज केला. तसेच अशरफभाई माजिदभाई लखानी अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे बदल्यात बक्षीस म्हणून तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. लाचेची रक्कम बुधवारी देण्याचे ठरल्यानुसार शिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांच्या दालनात चौधरी यांनी लाच स्विकारली. यावेळी पथकाने कारवाई करीत त्यांना रंगेहात पकडले. सायंकाळी झालेल्या या कारवाईने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. याबाबत नंदुरबार शहर पोलिसात सतिष सुरेश चौधरी (५२), रा. शांतीनगर, वाघेश्वरी मंदिराजवळ, नंदुरबार, मुळ रा. प्लॉट नंबर ८, गट नंबर ३५, मुक्ताईनगर, जि.जळगांव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरिक्षक नितीन पाटील, हवालदार चौधरी, अनिल गांगोडे,गणेश निंबाळकर यांनी केली.