कारागृहातील पोलीसाला कैद्यांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:26 PM2020-01-11T12:26:41+5:302020-01-11T12:26:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा कारागृहात न्यायबंदी असलेल्या दोघांनी थेट कारागृह पोलीसाला मारहाण केल्याची घटना पाच जानेवारी रोजी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा कारागृहात न्यायबंदी असलेल्या दोघांनी थेट कारागृह पोलीसाला मारहाण केल्याची घटना पाच जानेवारी रोजी घडली होती़ तब्बल पाच दिवस उलटल्यानंतर याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कारागृहात कर्तव्य बजावणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र सोमा रोकडे यांनी न्यायबंदी असलेल्या प्रविण आधार कोळी व गोकूळ शंकर चव्हाण या दोघांना बॅरेक क्रमांक पाच मध्ये जाण्याची सूचना केली होती़ याचा राग येऊन प्रविण कोळी आणि गोकूळ चव्हाण या दोघांनी रामचंद्र रोकडे यांची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ दरम्यान प्रविण कोळी यांनी पोलीस कॉन्स्टेबल रोकडे यांना मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ याप्रकारानंतर कारागृहातील कर्मचारी पुढे आल्यानंतर दोघे बॅरेकमध्ये गेले होते़ पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर रामचंद्र रोकडे यांनी तुरुंगाधिकारी प्रदीप रणदिवे यांच्याकडे अर्ज दिला होता़ त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे़ याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र रोकडे यांच्या फिर्यादीवरुन प्रविण कोळी व गोकूळ चव्हाण या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक जी़टी़पवार करत आहेत़
याबाबत तुरुंग अधिक्षक प्रदीप रणदिवे यांच्यासोबत शुक्रवारी दुपारी संपर्क केला असता, ते कारागृहात नसल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पथक शनिवारी कारागृहात जाऊन चौकशी करणार आहे़ यानंतर दोघांना अटक होणार किंवा कसे यावरही शनिवारीच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
दोघा बंदीवानांनी वाद घातल्यानंतर मारहाणीचा प्रकार घडत असताना तुरुंग अधिक्षक प्रदीप रणदिवे हे याच ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे़ परंतू त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अटकाव करण्यात आला नव्हता़ कारागृहातील दोघा बंदीवानांनी यापूर्वीही कारागृहात तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून कारागृह अधिक्षक यांच्याकडून त्यावेळी कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे़ कारागृह अधिकाऱ्यांना कॉन्स्टेबल रोकडे यांनी अर्ज दिल्यानंतर त्यावर तब्बल पाच दिवसांनी कारवाई करण्यात आल्याने पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़