रेवानगर परिसरातील विजेचा प्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 12:13 PM2018-09-24T12:13:06+5:302018-09-24T12:13:22+5:30
वीज उपकेंद्राचा प्रस्ताव : अधिकारी व ग्रामस्थांकडून जागेची पाहणी, ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर
तळोदा : तालुक्यासाठी वीज वितरण कंपनीकडून एक 33 के.व्ही. उपकेंद्र प्रस्तावीत असून यासाठी तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथे वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिका:यांसह जागेची पाहणी केली. हे उपकेंद्र कार्यान्वीत झाले तर या परिसरातील विजेची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. दरम्यान, वीज उपकेंद्रासाठी आवश्यक लागणारी जागा येथे उपलब्ध असून ग्रामपंचायतीनेही तसा ठराव मंजूर केला आहे.
सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या विस्थापितांचे तालुक्यातील रेवानगर, सरदारनगर, नर्मदानगर व रोझवा पुनर्वसन अशा वेगवेगळ्या वसाहतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या विस्थापितांना शासनाने जमिनींबरोबरच सिंचन सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या आहेत. तथापि, या परिसरातील वीज जोडण्या आणि कृषीपंपांची संख्या लक्षात घेता येथील विस्थापित शेतक:यांना सातत्याने विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अतिरिक्त वीजभारामुळे नेहमी तांत्रिक बिघाड होतो. त्यामुळे खंडित वीजपुरवठय़ालाही सामोरे जावे लागत असल्याची व्यथा बाधितांनी बोलून दाखवली आहे. या विस्थापितांची विजेची समस्या लक्षात घेऊन या परिसरात 33 के.व्ही. वीज उपकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागाकडेही करण्यात आली आहे. मात्र जिल्हा पुनर्वसन समितीकडे बाधीतांनी हा प्रश्न नेल्याने समितीच्या सदस्यांनी गेल्या दोन बैठकांमध्ये याप्रकरणी प्रश्न लावून धरला. साहजिकच प्रमुख अधिका:यांनीही वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका:यांकडे पाठपुरावा केला होता.
राज्य शासनाच्या बिरसा मुंडा कृषी योजनेंतर्गत तळोदा तालुक्यात एक 33 के.व्ही. वीज उपकेंद्राची मागणी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयानेही वरिष्ठांकडे केली आहे. त्या अनुषंगाने या प्रस्तावीत उपकेंद्रासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी एस.डी. पाटील व उपविभागीय अभियंता सचिन काळे यांनी रेवानगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य दाज्या पावरा, ग्रा.पं. सदस्य सबलाल पावरा, माजी सरपंच बारक्या पावरा, आपसिंग पावरा, दुरशा पावरा, विजय पावरा, लोटय़ा पावरा, लेह:या पावरा, अशोक पावरा व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रेवानगर ग्रा.पं.च्या हद्दीतील जागेची पाहणी केली. या उपकेंद्राला आवश्यक लागणारी तेवढी जागा उपलब्ध असून ग्रामपंचायतीनेही जागेचा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे अधिका:यांनी जागेसंदर्भात वीज वितरण कंपनीकडे कागदपत्रांची पूर्तता तातडीने करून द्यावी, अशी विनंती या अधिका:यांनी ग्रामस्थांना केली. कारण लगेच उपकेंद्राचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. जेणेकरून एक-दीड महिन्यात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले. या उपकेंद्रामुळे या परिसरातील विस्थापितांची विजेची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.