धनादेश वटत नसल्याने शेतकरी अडचणीत
By admin | Published: January 12, 2017 10:34 PM2017-01-12T22:34:30+5:302017-01-12T22:34:30+5:30
नोटाबंदीचा फटका : बांधकामासाठी पैसा मिळत नसल्याने स्वत:च विटांची निर्मिती
रांझणी : नोटाबंदीमुळे परिसरातील शेतक:यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतमाल विकून आलेल्या पैशाचे धनादेशदेखील बँकेत वटत नसल्याने व बँकेकडून पुरेसे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी 500 व एक हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाला होता. त्याला 60 दिवसांपेक्षा अधिक काळ होऊनदेखील शेतक:यांनी आपल्या खात्यात टाकलेल्या हजार व 500 रुपयांच्या चलनासह खरीप हंगामातील शेतमाल विकून आलेले धनादेशही बँकेत जमा करूनदेखील पुरेशा प्रमाणात पैसे काढता येत नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
सद्य:स्थितीत परिसरातील ज्या शेतक:यांनी जानेवारी ते मे दरम्यान घर बांधण्याचे नियोजन केले होते. त्यांना बांधकाम करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. बांधकामासाठी लागणा:या वीटा, रेती, सिमेंट पैसे नसताना आणायचे कुठून असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच काही शेतक:यांनी युक्ती वापरून स्वत:च आपल्या कुटुंबीयांसह विटा बनवणे सुरू केले असून, त्यांनी आपल्याला घर बांधण्यासाठी अंदाजे किती विटा लागतील याचा अभ्यास करून स्वत:च्या शेतातच विटा बनवणे सुरू केले आहे. तसेच विटा तयार करून त्यांची वीटभट्टी तयार करून पक्क्या होईस्तर पायाचे खोदकाम करून तयार होईस्तोवर रेती व सिमेंटसह कारागिरांसाठी लागणारी रक्कम मिळेर्पयत तयार होतील, अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सातपुडा परिसरात यंदा रब्बीचे क्षेत्र काहीसे कमी झाले असून, शेतकरी, ग्रामस्थ इतर कामे उरकण्यावर भर देत आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे काहीशी निराशा होत असल्याने त्यांनी ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे कामे करण्यास प्राधान्य देत आहेत.
(वार्ताहर)
शेतकरी स्वत:च्या शेतातच एकर-अर्धा एकर क्षेत्रात खोदकाम करून माती उकरून विटा तयार करीत आहेत. तसेच रांझणी गावाजवळील गु:हाळातून उसाचा लगदा, बारीक रेती आणून कोळसा मागवून वीट पक्की केली जाणार आहे. त्यामुळे शेतक:यांचे दोन पैसे वाचणार आहेत. तसेच उन्हाळ्यात जवळील लघुप्रकल्पातील सुपीक गाळ वाहून विटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या शेतात टाकला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होणार आहे.